
Sangli News : जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही अनेक भागांत हलका तर, काही भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. शिराळा तालुक्याच्या वारणा धरण क्षेत्रासह पूर्व भागात पावसाचा जोर वाढला. त्यामुळे भाताच्या रोपांची लागण करण्यासाठी शेतकरी नियोजन करू लागला.
जिल्ह्यात मंगळवारपासून (ता. १८) पावसाने सुरुवात केली. रात्रभर हलका, जोरदार पाऊस पडला. जिल्ह्यातील पश्चिम भागात हलका पाऊस झाला. तर, जिल्ह्याच्या पूर्व भागातील विविध भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांच्या टोकण्या करण्याचे नियोजन शेतकरी करू लागला आहे. तर काही ठिकाणी आडसाली हंगामातील ऊस लागवड सुरू झाली आहे.
शिराळा तालुक्यातील धरण क्षेत्रासह अन्य भागांत मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. त्यामुळे भात पिकांना नवसंजीवनी मिळाली. भात रोप लावणीसाठी शेतकरी नियोजन करू लागला आहे.
वारणा धरणात बुधवारी (ता. १९) सकाळपर्यंत १७.११ टीएमसी पाणीसाठा झाला. जिल्ह्यात २४ तासांत सरासरी १४.९ मिमी पावसाची नोंद झाली. शिराळात सर्वाधिक ३६.३ मिमी पावसाची नोंद झाली. दुपारनंतर जिल्ह्याच्या पश्चिम भागात ढगाळ वातावरण होते.
पावसाची आकडेवारी
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिमीमध्ये ः मिरजमध्ये १५.२ (८४), जत १४.२ (७०.६), खानापूर-विटा १०.४ (६१.१), वाळवा-इस्लामपूर ११.६ (८३.६), तासगाव १६ (९९.७), शिराळा ३६.३ (२४७.५), आटपाडी १०.२ (६४.५), कवठे महांकाळ १७ (७१), पलूस ९.६ (६८.७), कडेगाव ५.७ (६८.५).
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.