
ST Bus News Karad: एसटी महामंडळाच्या वातानुकुलीतसह सर्व बसेमधून महिलांना प्रवासात अर्धे तिकीट आकारण्यात येत आहे. यामुळे एसटीची प्रवासी संख्या वाढण्यास मदत झाली आहे. या सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम राज्य सरकार महामंडळाला देणार आहे. त्यामुळे एसटीच्या एकूण उत्पन्नात वाढ होत आहे. (Latest Marathi News)
या योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. केवळ सातच दिवसांत राज्यातील ७६ लाख ३ हजार ३२२ महिलांनी त्याचा लाभ घेतला आहे. त्यातून एसटी महामंडळाला १९ कोटी ७८ लाख २ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
तेवढीच रक्कम शासनाकडून प्रतिपूर्ती रक्कम म्हणून महामंडळाला मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटीसाठी ही योजना संजीवनीच ठरणार आहे.
सध्या एसटीतर्फे समाजातील विविध ३० घटकांना प्रवास भाड्यात ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येते. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीमधून मोफत प्रवासाची सुविधा गेल्या वर्षी २५ ऑगस्टपासून सुरु केली.
या योजनेचा लाभ आतापर्यंत सुमारे सहा कोटी ज्येष्ठ प्रवाशांनी झाला आहे. सध्या दररोज सरासरी पाच लाख पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक एसटीच्या विविध बसेसमधून मोफत प्रवास करतात. यामुळे महामंडळाला महिन्याला ६५ ते ७५ कोटी रुपयांची प्रतिपूर्ती रक्कम राज्य सरकारकडून मिळते.
सध्या एसटीतून दररोज ५० ते ५५ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यातून महामंडळाला दिवसाला प्रतिपूर्ती रकमेसह २२ ते २४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यापैकी सुमारे ३० टक्के महिला प्रवासी आहेत. म्हणजे १६-१७ लाख महिला प्रवासी आहेत.
यात १२ वर्षां खालील मुलींना आणि ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ महिलांना प्रवासी भाड्यात ५० टक्के, तर ७५ वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ महिलांना १०० टक्के सवलत देण्यात येते. नव्या योजनेमुळे १६-१७ लाख महिला प्रवाशांपैकी दररोज सुमारे १३ लाख महिला प्रवाशांना ५० टक्के तिकीट सवलतीचा फायदा होत आहे.
विभागानिहाय महिला प्रवासी संख्या
छत्रपती संभाजी नगर विभाग - ११ लाख ९६ हजार ३१५
पुणे विभाग - १९ लाख २६ हजार ७८३
मुंबई विभाग - १४ लाख २३ हजार २५८
अमरावती विभाग - आठ लाख १३ हजार ८४५
नागपूर विभाग - आठ लाख ७३ हजार ६८०
नाशिक विभाग - १३ लाख ६९ हजार ४४१
राज्य सरकारने अर्थसंकल्पावेळी महिलांना ५० टक्के एसटीच्या तिकिटात सवलत देण्याचे जाहीर केले. त्याची अंमलबजावणी सुरु आहे. महामंडळाचा दर महिन्याला सरासरी खर्च सुमारे ८५० कोटी आहे. दरमहा उत्पन्न ७२० कोटी आहे. महिला प्रवासी वाढल्यामुळे एसटीचे उत्पन्न वाढले आहे. त्याचा महामंडळाला चांगला फायदा होत आहे.
- अभिजित भोसले, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ, मुंबई.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.