Rural Development : मार्गदर्शन, नेतृत्व, लोकसहभाग ही ग्रामविकासाची त्रिसूत्री : गमे

सर्वांगीण ग्रामविकासासाठी अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन, गावातील ध्येयनिष्ठ नेतृत्व आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग या तीन बाबी आवश्‍यक आहेत, असे प्रतिपादन नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.
Rural Developement
Rural DevelopementAgrowon

नाशिक : सर्वांगीण ग्रामविकासासाठी (Rural Development) अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन, गावातील ध्येयनिष्ठ नेतृत्व आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग या तीन बाबी आवश्‍यक आहेत, असे प्रतिपादन नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Radhakrushna Game) यांनी केले. सह्याद्री रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन (Sahydri Rurak Foundation) व सत्व फाऊंडेशन, (Satwa Foundation) पुणे यांच्यातर्फे बुधवारी (ता. १९) मोहाडी क्लस्टरमधील १६ गावांतील सर्वांगीण ग्रामविकास कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. श्री. गमे अध्यक्षस्थानी होते.

सत्व फाऊंडेशनचे अध्यक्ष व माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सह्याद्री रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे संचालक विलास शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते. या ग्रामविकास प्रकल्पांतर्गत सर्वांगीण ग्रामविकासासाठी तयार करण्यात आलेला ग्रामविकास आराखडा आणि त्रिपक्षीय करारावर सत्त्व फाउंडेशन (पुणे), सह्याद्री रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन, नाशिक आणि संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच आणि उपसरपंच यांच्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या प्रकल्पासाठी गेली चार वर्षे काम सुरू होते.

गमे म्हणाले, की गावात ध्येयनिष्ठ तरुणांचे नेतृत्व पुढे आले आणि लोक एकत्र आले तर गावात क्रांती घडते. शासनाकडून आता मोठ्या प्रमाणावर निधी हा थेट ग्रामपंचायतींकडे येत असल्याने त्या सक्षम झाल्या आहेत. या परिस्थितीत गावाचा विकास आराखडा प्रत्यक्षात येणे शक्य आहे. राजकारण ठराविक काळापुरते मर्यादित ठेवावे. नंतर विकासाला प्राधान्य द्यावे. मित्तल म्हणाल्या, क्लस्टरमधील १६ गावे ही विकासाचे आदर्श मॉडेल म्हणून समोर येतील. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून सर्वतोपरी साह्य केले जाईल.

दळवी म्हणाले, की प्रकल्पासाठी सातारा जिल्ह्यातील निढळ हे आदर्शगाव मॉडेल म्हणून केंद्रस्थानी ठेवले आहे. गावाचा भौतिक, आर्थिक आणि मानव विकास ही सत्त्व फाउंडेशन प्रणित ग्रामविकासाचे मुख्य घटक आहेत. त्याअंतर्गत गावात सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध करणे, प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढवत राहणीमाण सुधारणे, तरुणवर्ग, विद्यार्थी, महिला, मागासवर्गीय, आदिवासी घटक, महिला कल्याणाचे कार्यक्रम राबवणे, व्यसनमुक्त गाव आणि धार्मिक सदाचरण या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सुरेश नखाते यांनी सूत्रसंचालन केले.

गावातील प्रत्येक घटकांत प्रचंड क्षमता : दळवी

गावाबाहेर गेलेल्या ग्रामस्थांची नोकरवर्ग आणि व्यावसायिक संघटनेची स्थापना करून त्यानंतर ग्रामविकास आराखडा तयार केला. गावाच्या प्राधान्याच्या गरजा विचारात घेतल्या. भौतिक, आर्थिक आणि मानव विकास या तीन भागात आराखडा तयार केला. यातून मागील ४० वर्षांत टप्प्याटप्प्याने गावाचा विकास होत गेला. गावांचा सर्वांगिण विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी गावाने एकत्र आले पाहिजे.

हे काम सातत्याने करावे लागेल. त्यासाठी ध्येयनिष्ठ नेतृत्व गरजेचे आहे. असे नेतृत्व त्याच गावातून आले पाहिजे. गावातील प्रत्येक घटकांत प्रचंड क्षमता आहे. ती विकासाला जोडली पाहिजे. ग्रामविकास समितीच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र यावे. पक्षीय राजकारण असणे गैर नाही, निवडणुकांतील लोकांचा सहभागही आवश्यकच आहे; मात्र निवडणुका संपल्या की गावाच्या विकासासाठी सगळ्यांनी एकत्र यावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com