
Sangli Grapes : सांगली जिल्ह्यातील मागच्या काही महिन्यांपूर्वी बड्या द्राक्ष व्यापाऱ्याला गंडा घालण्यात आला आहे. दरम्यान द्राक्ष मालाची खरेदी करून पैसे न देता तब्बल ५६ लाख ६७ हजार ९२० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील रहिवासी मारूती नामदेव टेंगले यांनी गुजरातच्या अहमदाबादमधील शाजाद शेख, आणि दिवाणजी अहमद खान यांच्याविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. १ फेब्रुवारी ते १४ सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मारूती टेंगले हे द्राक्ष विक्रीचे कमिशन एजंट म्हणून काम करतात. पेठभाग, जामवाडी येथील अंजली फ्रुट सेंटर अॅण्ड सप्लायर्समार्फत मागच्या काही वर्षांपासून टेंगले व्यवसाय करतात. दरम्यान गुजरात येथील संशयितांनी ए वन कंपनीच्या माध्यमातून टेंगले यांच्याशी संपर्क साधला होता.
टेंगले यांचा विश्वास संपादन करून द्राक्ष मालाची खरेदी केली होती. टेंगले यांनी मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांकडून माल खरेदी करून तो गुजरातमधील संशयितांना दिला. माल घेतल्यानंतर त्यांनी रोखीने पैसे देणे अवघड असल्याचे सांगत त्यांना २५ लाख रुपयांचे पाच धनादेश दिले होते.
यानंतर टेंगले यांनी ५५० टन द्राक्षमाल खरेदी करून गुजरातमध्ये नेला होता. ज्याची किंमत एक कोटी ७८ लाख ८१ हजार ५८२ रुपये इतकी होती. संशयितांनी यातील एक कोटी २४ लाख १३ हजार ६६५ रुपये परत दिले. मात्र, उर्वरित रक्कम दिली नाही.
उर्वरित ५४ लाख ६७ हजार ९२० रुपये आणि कामगारांची मजुरी दोन लाख रुपये असे ५६ लाख ६७ हजार ९२० रुपये परत मिळावेत, यासाठी टेंगले प्रयत्नशील होते. मात्र, संशयितांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. सांगली जिल्ह्यात यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.