गुळुंचे : जिल्ह्यातील जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat Ward Formation) प्रभाग रचनेचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला.
जिल्ह्यातील २३३ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना करणार असून, २५ एप्रिल २०२३ रोजी हा कार्यक्रम संपणार आहे. त्यानंतर निवडणूक (Gram Panchayat Election) विभागाकडून या पंचायतीच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे.
मुदत संपल्याने जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले आहेत. तर, काही पंचायतींची मुदत चालू वर्षात संपत आहे.
अशा सर्वच ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे एकाच कालावधीत या निवडणुका होतील, असे मानले जात आहे.
दरम्यान, अनेक गावात आगामी दोन महिन्यांत निवडणुका लागतील, या आशेवर अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणूक लढविण्यासाठी चाचपणी करायला सुरुवात केली होती. अनेकजण जनमताचा कौल जाणून घेण्यात व्यग्र दिसत होते.
मात्र, निवडणूक आयोगाकडून विस्तारित टप्पा घेण्यात आल्याने साहजिकच ग्रामपंचायतींचा प्रशासक कालावधी देखील वाढणार आहे. त्यामुळे लवकर निवडणुका होतील, या आशेवर बसलेल्या अनेक गावपुढाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
दरम्यान, चुकीची प्रभागरचना झालेल्या ग्रामपंचायतींच्या देखील पुन्हा प्रभागरचना करण्यात येणार आहेत. लगतच्या जनगणनेच्या आधारावर प्रभाग रचना करण्यात येणार आहे.
कमाल सदस्य संख्या चक्राकार पद्धतीच्या नियमाप्रमाणे फिरवावी लागणार आहे. प्रभाग रचनेची मांडणी गूगल अर्थ, MRSAC, EXRI, Qmpas च्या नकाशावर करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये प्रारूप प्रभागरचना व प्रारूप रचना समिती करणार आहे. त्यासाठी संबंधित तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करणार आहे.
या समितीत गटविकास अधिकारी व मंडल अधिकारी प्रभाग रचनेचे काम करणार आहेत. प्रभाग रचनेवर हरकत घेण्यासाठी कालावधी दिला आहे.
निवडणुका पुढे गेल्याने आता विकासकामांवर मर्यादा येतील, असे वाटते. लवकरात लवकर निवडणुका घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने पावले उचलणे गरजेचे आहे.
- नितीन निगडे, ग्रामस्थ, गुळुंचे (ता. पुरंदर)
ग्रामपंचायतींची प्रभागरचना
बारामती ३२
आंबेगाव ३०
भोर २७
जुन्नर २६
खेड २५
मुळशी २३
मावळ २०
पुरंदर १५
दौंड ११
शिरूर ८
इंदापूर ६
वेल्हे ६
हवेली ४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.