
Solapur News : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार स्व. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचे अनावरण व महाविद्यालय नामांतर सोहळ्यासाठी रविवारी (ता. १३) सांगोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज व डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला येथे रविवारी दुपारी एकच्या सुमारास महाविद्यालयाच्या आवारात उभारलेल्या स्मारकाचे अनावरण श्री. पवार यांच्या हस्ते होणार आहे. पुणे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमानंतर शरद पवार व देवेंद्र फडणवीस सांगोल्यात एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
या कार्यक्रमासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, माजी मंत्री महादेव जानकर उपस्थित राहणार आहेत.
ब्रांझधातूचे स्मारक
महाविद्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या देशमुख यांच्या या स्मारकाचे वजन ६०० किलो असून, ते संपूर्ण ब्रांज धातूपासून बनवण्यात आले आहे. स्मारकाची उंची साडेआठ फूट असून त्याची उभारणी गजानन सलगर (मिरज) यांनी केली आहे.
पवार साधणार सेंद्रिय शेती करणाऱ्यांशी चर्चा
महाविद्यालयाच्या प्रांगणात देशमुख यांच्या स्मारक अनावरणाच्या कार्यक्रमानंतर दुपारी साडेचार वाजता श्री. पवार हे महाऑरगॅनिक अॅण्ड रेसिड्यु फ्री असोसिएशन (मोर्फा) यांच्या वतीने सेंद्रिय व विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी हर्षदा लॅान्स येथे चर्चा कऱणार आहेत, यात सेंद्रिय शेतीतील अडचणी आणि त्यावरील उपायांवर चर्चा होणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.