पुणे ः अनेक समस्यांशी तोंड देणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची (Farmer Producer Company) (एफपीसी) वाटचाल कठीण आहे. त्यामुळे काही वेळा निराशेशी सामना करावा लागतो. मात्र, समूह शेतीशिवाय (Group Farming) देशाच्या कृषी क्षेत्राला पर्याय नसल्याने एफपीसींनी प्रामाणिकपणे धैर्याने लढावे. यात हमखास विजय आपलाच आहे, अशा शब्दात सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे (Vilas Shinde) यांनी राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींना बळ दिले.
‘अॅग्रोवन शेतकरी उत्पादक कंपनी महापरिषदे’च्या (एफपीसी लीडरशिप कॉन्क्लेव्ह) समारोप सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर ‘अॅग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण, ‘आत्मा’चे संचालक दशरथ तांभाळे होते. श्री. शिंदे यांनी उपस्थित एफपीसींच्या शेतकरी प्रतिनिधींना आव्हाने आणि संधी यांची अनुभवसिद्ध माहिती दिली. ‘‘एफपीसी हजारो असल्या तरी काही चांगल्या काम करीत असून, काही थांबलेल्या आहेत. काही कागदावरच आहेत.
तरीही काही नव्याने स्थापन होत आहेत. त्यामुळे नेमके कोणत्या ध्येयासाठी आपण कंपनी स्थापन करीत आहोत, हे आधी ठरवा. आपल्या भोवती समस्यांचा गुंता तयार झालेला आहे. पण तो आपल्यालाच सोडवावा लागेल. आता ‘अॅग्रोवन’च्या एफपीसी महापरिषद उपक्रमातून एक आशादायक चित्र तयार होते आहे. पण पूर्वी आम्हालादेखील कर्ज नाकारले गेले. मात्र त्याच बॅंका आमच्या दारात उभ्या राहिल्या. त्यासाठी आम्ही शेतकरी सभासदांमध्ये विश्वास तयार केला.’’ आपल्याला संघर्ष करावाच लागेल. प्रामाणिक हेतू ठेवल्यास भविष्यात एफपीसींमध्ये गुंतवणूकदेखील हमखास होईल, असेही श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.
‘‘राज्यात स्मार्ट प्रकल्पातून मूल्यसाखळी विकासातून छोटे शेतकरी, महिला शेतकऱ्यांच्या बळकटीकरणाचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. त्यासाठी एक हजार प्रकल्प राबविले जातील. यात एफपीसी, बचत गट तसेच बचत गटांचे महासंघ सहभागी करून घेतले जात आहेत. मूल्यसाखळीतील सर्व घटकांना एकत्र आणून त्यांना एकमेकांशी जोडणे हा हेतू या प्रकल्पाचा आहे. कृषिविषयक धोरणात्मक काम यापुढे मूल्यसाखळीवरच होईल. त्यामुळे एफपीसींना भविष्यात महत्त्व येईल,’’ असे ‘आत्मा’चे संचालक श्री. तांभाळे यांनी स्पष्ट केले. या वेळी ‘अॅग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांनी महापरिषदेचा फलश्रृतीचा आढावा घेतला. अॅग्रोवनचे उपसरव्यवस्थापक बाळासाहेब खवले यांनी आभार मानले.
विलास शिंदे हेच एफपीसींचे दीपस्तंभ
विलास शिंदे यांनी एफपीसींच्या क्षेत्रात केलेल्या आदर्श कामाचा गौरवपूर्ण उल्लेख करताना आत्माचे संचालक दशरथ तांभाळे म्हणाले, की आपण सामाजिक क्षेत्रात इतर अण्णा पाहत आलेलो आहोत. पण एफपीसी क्षेत्रातील विलासअण्णा हेच आपले दीपस्तंभ आहेत. त्यांच्याकडे पाहत पुढील वाटचाल करायची आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.