
Millet Year नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच केंद्र सरकार भरडधान्य (Millet Crop) उत्पादक शेतकऱ्यांच्या गरजांकडे लक्ष देत आहे. अन्नसुरक्षेच्या (Food Security) समस्येवर भरडधान्ये एक प्रभावी उपाय ठरू शकते, तसेच त्यामुळे लोकांच्या खानपानाच्या सवयींमध्ये देखील बदल होण्यास मदत होईल.
संशोधकांनी देखील आपल्या देशाच्या फूड बास्केटमध्ये अधिकाधिक पोषक अन्नधान्याचा समावेश कसा होईल? याकडे लक्ष द्यावे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी येथे मांडले.
पुसा येथे आयोजित वैश्विक भरडधान्य (श्री अन्न) परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, उद्योग व वाणिज्यमंत्री पीयूष गोयल उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर केले असून, भारतानेच याबाबत प्रयत्न करून तसा प्रस्ताव सादर केला होता. त्याला पुढे मान्यता देण्यात आली ही आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
एक जागतिक चळवळीचा भाग म्हणून भारत सातत्याने भरड धान्याला ‘श्री अन्न’ म्हणून प्रोत्साहन देत आहे. प्रतिकूल वातावरणामध्ये देखील भरडधान्य सहज येऊ शकते त्यासाठी फारशी रसायने आणि खतेदेखील वापरण्याची आवश्यकता नसते. देशाच्या भरडधान्य मोहिमेचा अडीच कोटी लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.’’
कंपन्यांनी उत्पादन वाढवावे
सध्या देशाच्या फूड बास्केट भरडधान्याचा वाटा हा पाच ते सहा टक्के एवढा असून हे प्रमाण वेगाने वाढविण्यात यावे, असे आवाहन मी देशातील संशोधक आणि शेतकऱ्यांना करतो. आम्हाला याबाबतीत साध्य करण्याजोगे ध्येय निश्चित करावे लागेल.
अन्न प्रक्रिया उद्योगासाठी सरकारने उत्पादनाशी संबंधित लाभांश योजना सुरू केली आहे. कंपन्यांनी देखील याचा फायदा घेत भरडधान्यावर आधारित उत्पादनांमध्ये वाढ करावी, असे मोदी यांनी सांगितले.
भारताने केले नेतृत्व
भरडधान्य आणि पोषक अन्नधान्याचे महत्त्व विशद करताना मोदी म्हणाले, ‘‘देशातील लोकांना हा पोषण आहार देण्याबरोबरच देशांतर्गत आणि वैश्विक मागणीदेखील निर्माण करण्यात यावी.
चालू वर्षाला आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेमध्ये ठराव करण्यात आला होता.
त्यासाठी देखील भारताने पुढाकार घेतला होता. जगातील ७२ देशांनी भारताच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आमसभेने २०२१ मध्ये २०२३ ला आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला होता.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.