
सांगली ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी द्राक्षाच्या फळछाटणीस (Grape Fruit Satara) प्रारंभ झाला. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रामुख्याने फळछाटणी केली जाते. परंतु यंदा एक महिना उशिरा फळछाटणीस सुरुवात झाली असून, आतापर्यंत सुमारे ५० टक्के क्षेत्रावरील फळछाटणी पूर्ण झाली आहे.
जिल्ह्यात सर्वसाधारणपणे द्राक्षाचे १ लाख २५ हजार एकरावर क्षेत्र आहे. दरवर्षी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात फळछाटणीस प्रारंभ होतो. फळछाटणीसाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच परराज्यांतून मजूर दाखल होतात.
परंतु गेली दोन वर्षे फळछाटणी केल्यानंतर परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीचा तडाखा द्राक्ष बागेला बसला होता. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला होता. यंदाच्या एप्रिलमधील खरड छाटणीला देखील काही प्रमाणात विलंब झाला होता.
त्यातही या वर्षी उशिरा पावसाने हजेरी लावली. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत पाऊस सुरू होता. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी फळछाटणीस सुरुवात केली नाही. त्यामुळे फळछाटणीसाठी परराज्यातून मजूरदेखील आले नव्हते.
सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून फळछाटणीचे शेतकरी नियोजन करू लागल्या असल्याने परराज्यातील मजूर जिल्ह्यात दाखल झाले. सप्टेंबरच्या मध्यापासून फळछाटणीस प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत ५० टक्के क्षेत्रावर फळछाटणी उरकली आहे. सध्या बागेवर कोणत्याही प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव नाही. परंतु तीन ते चार दिवसांपासून बदलते व ढगाळ वातावरण आणि पावसामुळे द्राक्ष बागेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.