Sangli News : यंदा उन्हाळी पावसाने दडी मारली. जून महिना संपला. जुलै महिना निम्मा झाला, तरी पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे भाजीपाल्यासाठी तयार केलेली शेती तशीच पडून आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस झाला. त्या पावसावर लागवड केली असून, आता पाण्याची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
जिल्ह्यात भाजीपाला रोपांच्या मागणीतही वाढ नाही. त्यामुळे शेतकरी भाजीपाला लागवडीसाठी सावध पावले उचलत आहेत. पाण्याची कमतरता असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
जिल्ह्यात भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. तर दुष्काळी पट्ट्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली. यामुळे या चार वर्षांत पाणीटंचाई कधीच भासली नाही.
त्यामुळे भाजीपाल्याच्या क्षेत्रातही वाढ झाल्याचे कृषी विभागाने सांगितले. जिल्ह्यात भाजीपाल्याचे क्षेत्र सुमारे दहा हजार हेक्टरपेक्षा अधिक आहे. ढोबळी मिरजी, काकडी, कारले, दोडका, कोबी, फ्लॉवर, वांगी, टोमॅटो आदी पिके शेतकरी घेतात. उन्हाळ्यात उपलब्ध पाणी देऊन त्यांनी भाजीपाला पिके जगविली.
जिल्ह्याच्या पूर्व भागात ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनेची आवर्तने सुरू केली जातात. या पाण्यावर शेतकरी भाजीपाला लागवड करण्याचे नियोजन करतात. परंतु यंदा धरणक्षेत्रातच पाऊस नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी भाजीपाला लागवडीचे धाडस करत नसल्याचे चित्र आहे.
रोपांची मागणी कमीच
‘‘भाजीपाला रोपवाटिकेत शेतकऱ्यांनी रोपांची नोंदणी केली. पण पाऊस नसल्याने रोपांचा उठाव झाला नाही. गेल्या महिन्यात ७० टक्के रोपांची मागणी घटली. गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्याच्या पश्चिम भागात पुरेसा पाऊस झाल्याने १० टक्के रोपांची विक्री झाली आहे. परंतु ५० ते ६० टक्के अजूनही रोपांची मागणी कमीच आहे’’, असे रोपवाटिका मालकांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.