
Sangli News : सांगली जिल्ह्यातील शेटफळे (ता. आटपाडी) येथील रेखाई तलावात टेंभूच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी पैसे भरून त्यांना पाणी न दिल्याने शेतकरी संतप्त झाले होते. दरम्यान मागचे काही दिवस मागणी करूनही पाणी दिले जात नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत कालव्यावर तळ ठोकला होता.
याची दखल घेत अखेर जागे झालेल्या प्रशासनाने रेबाई तलावात पाणी सुरू केले. यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याच्या शेटफळे येथील रेबाई तलाव कोरडा पडला आहे. तलावातून शेतकऱ्यांनी सामुदायिक सहा सात किलोमीटर अंतर लांबवर पाइपलाइन करून पाणी नेले आहे. या पाण्यावर शेकडो एकर डाळिंबाच्या बागा फुलवल्या आहेत. परंतु तलावात पाणी नसल्याने बागा धोक्यात आल्या आहेत.
दरम्यान बागा जगवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी टेंभू उपसा सिंचन कार्यालयाकडे अगोदर पाणीपट्टी भरून पाण्याची मागणी केली होती. उन्हाळी आवर्तनात तलावात पाणी दिले नव्हते. खरिपाचे आवर्तन सुरू होऊन सव्वा महिना झाला, तरीही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. सुरुवातीला सांगोला तालुक्याचे नंतर कवठेमहांकाळचे झाल्यावर पाणी देतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुन्हा दुसऱ्यांदा सांगोल्याला पाणी सुरू केले. रेबाई तलावावरूनच हा कालवा जातो. ते पाणी चालू करताना, मात्र रेबाई तलावासाठी नुकतेच सोडलेले पाणी बंद केले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. तलावात नुकतेच पाणी पोहोचले होते. शेतकऱ्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे धाव घेऊन कालव्यावर तळ ठोकला.
आमदार पडळकर यांनी कालव्यावरून कार्यकारी अधिकारी रेडीयार यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. अधिकाऱ्यांनी जेसीबी मशिन पाठवून तीन पाईपमधून रेबाई तलावासाठी पुन्हा पाणी सुरू केले. यावेळी पतंगराव गायकवाड, दत्ता कांबळे, हरिदास गायकवाड, पांडुरंग गायकवाड, दत्तात्रय गायकवाड आदी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.