
Krishna River Drought : जुलै महिन्याच्या शेवटी पाऊस गायब झाला आहे तो अद्यापही होत नसल्याने शेतकऱ्यांसह नदी काठच्या गावांची परिस्थिती बिकट होत चालली आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने दडी मारल्याने शेती पिके करपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तर सांगली जिल्ह्यात कृष्णा नदी ऐन पावसाळ्यात कोरडी पडली आहे. यामुळे सांगली जलसंपदा विभागाकडून सिंचनासाठी मागणी झाल्याने कोयनेच्या पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण पाणीसाठा ८६ टीएमसीजवळ आहे.
मागच्या अडीच महिन्यात राज्यातील सांगली जिल्ह्यात सर्वाधिक कमी पावसाची नोंद झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पश्चिम भागात जेमतेम पाऊस झाला असलातरी पूर्वेकडे मात्र प्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी पिके वाळून चालली आहेत. यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
याचबरोबर सांगली जिल्ह्यात कोयना धरणाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. कोयना धरण अद्याप ८० टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा आहे. तर काही दिवस पाऊस राहिला आहे परंतु पाऊस होणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे यंदा धरणे भरणार का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशातच अनेक भागांतून धरणामधून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी होत आहे. यामुळे प्रमुख धरणे भरणे गरजेचे आहे.
रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला १३ तर नवजाला १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. महाबळेश्वरला ४० मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर एक जूनपासूनचा विचार करता सर्वाधिक पाऊस ४९२८ मिलिमीटर झालेला आहे. तर कोयना येथे ३४५८ आणि महाबळेश्वरला ४६४० मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. रविवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ८५.७७ टीएमसी पाणीसाठा होता. तर धरणात ६२५९ क्यूसेक वेगाने पाणी येत होते.
सांगलीसाठी पायथा वीजगृहातून पाणी सोडले...
सांगली जिल्हा सिंचन विभागाने कोयना धरण व्यवस्थापनाकडे सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यामुळे शनिवारी दुपारपासून कोयनेच्या पायथा वीजगृहातील एक युनिट सुरू करण्यात आले आहे. त्यातून १०५० क्यूसेक पाणी सांगलीसाठी सोडण्यात आलेले आहे. रविवारीही हा विसर्ग सुरूच होता.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.