
Pune News : ातक ठरणाऱ्या शहरी जीवनशैलीत गुरफटलेल्या तरुणांना ‘निसर्ग, स्वास्थ आणि शिवरायांची महती’ अशी त्रिसूत्री समजावून सांगण्याचा अनोखा वसा मारुती ऊर्फ आबा गोळे यांनी घेतला आहे. आबा स्वतः गेल्या चार वर्षांपासून आग्रा ते राजगड असे १२५३ किलोमीटरची पदयात्रा करीत आहेत. चार राज्यांमधून होणाऱ्या या पदयात्रेत यंदा १२८० युवक सहभागी झाले होते.
पुण्याच्या मुळशीतील पिरंगुट भागातील ४३ वर्षीय आबा हे मावळातील उच्चशिक्षित शेतकरी आहे. १२ एकर शेती सांभाळत ते विधी शाखेचे पदवीधर झाले. भात, ज्वारी, भुईमुगाची शेती ते करतात. वेळ काढून ‘निरोगी महाराष्ट्र’ या संकल्पनेवर ते काम करतात. त्यांनी युवकांना पायी चालण्याचा संदेश दिला आहे.
त्यासाठी ‘पायदळ एक वादळ’ अशी संकल्पना मांडली. औरंगजेबाच्या कैदेतून चातुर्याने सुटका करून घेत शिवरायांनी ‘आग्रा ते राजगड’ पायी प्रवास केला होता. तोच धागा पकडत आंबा दरवर्षी राज्यातील तरुणांना, शेतकरीपुत्रांना बरोबर घेत आग्रा गाठतात. तेथून ते शिवज्योत घेऊन पायी राजगडावर येतात.
‘रक्तदाब व मधुमेहमुक्त भारत’ अशी दुसरी चळवळ आबा राबवत आहेत. ‘हा प्रदेश रणझुंजार शिवरायांचा आहे. जागतिक पातळीवर त्यांच्या युद्धकौशल्य व धैर्याचा आदर होतो. त्या काळात सुविधा नसतानाही शिवराय व मावळ्यांचे आरोग्य कणखर होते. आता सुविधा असतानाही आपण आरोग्याची काळजी घेत नाही. आता कमी वयात विविध व्याधी जडत आहेत. या घातक जीवनशैलीकडून युवकांना बाहेर काढायला हवे.
त्यासाठी त्यांना निसर्गाकडे वळवावे लागेल. शिवरायांचे विचार त्यांच्या मनात रुजवावे लागतील. सामाजिक कामकाजात सहभाग वाढविण्यासाठी प्रोत्साहित करावे लागेल. त्यामुळेच मी ‘पायदळ एक वादळ’ ही संकल्पना मांडली आहे. कौतुकाची बाब म्हणजे, आमच्या चळवळीत शेतकऱ्यांची मुले मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. या चळवळीला शहरवासीयांकडून प्रतिसाद मिळतो आहे,’’ असे आबांनी आनंदाने सांगितले.
आग्रा येथून दरवर्षी चार राज्यांतून पायी प्रवास करीत आबांकडून शिवज्योत राजगडावर आणली जाते. तेथे यात्रेचा समारोप होतो. शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वरला घेतली होती. आबांच्या संकल्पनेला पाठिंबा म्हणून ‘श्रीमान रायरेश्वर प्रतिष्ठान’मधील शेतकरीपुत्र हीच शिवज्योत पुढे रायरेश्वराला नेत आहेत. सारे जण तेथे एकत्र येत जलाभिषेक करतात. त्यानंतर निरोगी व आदर्श भारत घडविण्याची शपथ घेतात.
प्रकृती कशी सांभाळावी याचा आदर्श आबा रोज स्वतःच्या कृतीतून युवकांसमोर ठेवत असतात. ते शेती, व्यावसायिक काम सांभाळून डोंगरभ्रमंती करतात. हिंदवी स्वराजाचे पायदळ प्रमुख नरवीर पिलाजी गोळे यांचे चौदावे वंशज असलेले आबा आतापर्यंत ६१४ वेळा सिंहगड, ४९ वेळा तोरणा आणि १६३ वेळा राजगड चढले आहेत. ते ४० वेळा मॅरेथॉन धावले आहेत. ‘निर्व्यसनी व सुविचारी राहा; सतत चालत राहा’ असा मंत्र ते युवकांना देतात.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.