
Alibaug News : मुरूड आणि रोहा तालुक्यातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीकिनारी प्रस्तावित केंद्र सरकारच्या ड्रग्ज बल्क फार्मा प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होत आहे.
येथील १७ गावांमधील चार हजार ९९७ एकर जागा संपादित करण्यात येणार असून जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसा पाठवल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांनी रासायनिक प्रकल्पास कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाला ठासून सांगितले.
महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचे अधिकाऱ्यासह मंगळवारी नियोजन भवनात बैठक झाली. या वेळी आमदार महेंद्र दळवी यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांनीही प्रकल्प कसा फायदेशीर आहे, याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला; परंतु शेतकरी आपल्या मुद्द्यावर ठाम होते.
एमआयडीसीने सुरुवातीलाच चित्रफितीच्या माध्यमातून ड्रग्ज बल्क फार्मा प्रकल्प कशा प्रकारे असेल, तेथे किती रोजगार दिला जाईल, याची माहिती दिली. या वेळी शेतकऱ्यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, अॅड. महेश मोहिते यांनी बाजू मांडली. मध्यंतरी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या जनसुनावणी येथील शेतकऱ्यांनी उधळून लावली होती.
काय आहे प्रकल्प?
उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारमार्फत देशात चार मोठे बल्क पार्क उभारण्यात येणार आहेत. यातील एक प्रकल्प महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात व्हावा यासाठी महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारकडे मागणी केली होती. यासाठी मुरूड आणि रोहा तालुक्यातील १७ गावांतील जागा संपादित केली जाणार आहे.
या प्रकल्पामुळे जिल्ह्यात ३० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. प्रकल्पामुळे ७५ हजार रोजगार निर्मिती होईल आणि हा औषधनिर्मिती प्रकल्प प्रदूषण विरहित असेल असा दावा उद्योग मंत्रालयाने केलेल्या सादरीकरणात केला आहे.
औषध निर्माण उद्यान प्रकल्प अडचणीत
केंद्र शासनाच्या रसायन व खते मंत्रालयाच्या २ जून २० च्या अधिसूचनेनुसार, औषध निर्माण विभागाने उद्याने विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला प्रोत्साहन देण्यासंदर्भात रोहा व मुरूड तालुक्यातील १७ गावांमधील जमिनी औषध निर्माण उद्यान प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता.
कोरोनानंतर याविषयावर राज्य शासनाने कोणत्याही हालचाली केल्या नव्हत्या, मात्र गेल्या महिन्यात भूसंपादनाच्या नोटिसा देण्यात आल्या. राज्य शासनाने किमान म्हणणे ऐकून घ्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्यानुसार मंगळवारी बैठक आयोजित केली होती.या वेळीही शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका घेतल्याने बल्क फार्मा प्रकल्प अडचणीत आला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.