
Landslide Prone Area : अलिबाग : दरड कोसळल्यानंतर इर्शाळवाडीत किती ग्रामस्थ राहत होते, त्यातील किती जिवंत आहेत, यासह त्यांच्या मालमत्तेची कोणतीही माहिती प्रशासनाकडे नव्हती. ती जमवण्यात संबंधित यंत्रणेला अनेक अडचणी येत आहेत. यातून बोध घेत जिल्हा प्रशासनाने ‘डॅड’ (डिझास्टर ॲनॅलिसिस डिटेल कार्ड) प्रणाली सुरू केली असून रायगडमधील १०३ दरडप्रवण गावांतील नागरिकांची इत्थंभूत माहिती संकलित केली जाणार आहे. अशाप्रकारची प्रणाली वापरणारा रायगड पहिलाच जिल्हा आहे.
जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी ‘डॅड’ प्रणालीची मांडणी केली असून आपत्तीनंतर संबंधित कुटुंबाच्या नातेवाईकाला एसएमएसद्वारे तत्काळ आपत्तीची माहिती मिळू शकेल. यासाठी एक सॉप्टवेअर तयार करण्यात येणार आहे. मंगळवारपासून (ता. १) सुरू झालेल्या महसूल सप्ताहानिमित्त दरडग्रस्तांची माहिती संकलित करण्यास सुरुवात होत आहे.
दरडग्रस्त गावात जाऊन महसूल विभागाचे अधिकारी माहिती भरून घेणार आहेत. याची एक प्रत संबंधित कुटुंब प्रमुखाकडे आणि दुसरी तहसील कार्यालयात असेल. यातील माहितीमध्ये आपत्तीच्या वेळेस त्या गावात किती लोक राहत होते, त्यांच्या घराची, जमिनीची कागदपत्रे, गावात बाहेरून किती पाहुणे आले होते, जवळच्या नातेवाइकांचा संपर्क क्रमांक, बाहेरगावी शिक्षण किंवा नोकरी करणाऱ्यांची माहिती भरून घेतली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी सांगितले.
मुलांना मिळणार मालमत्तेची माहिती
इर्शाळवाडीमध्ये किती लोक बचावले, याची आकडेवारी जाहीर करण्यास जिल्हा प्रशासनाला दोन दिवस लागले. अद्यापही बेपत्ता असलेल्या नागरिकांना मृत घोषित केलेले नाही. इर्शाळवाडीमध्ये अशीही काही कुटुंबे आहेत, की ज्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य जिवंत राहिलेला नाही. त्याचबरोबर ३१ शालेय विद्यार्थी आहेत. त्यांना पालकांची मालमत्ता, बॅंकेचे तपशील, जमिनीची माहिती सांगता येत नाही. ही अडचण ‘डॅड’ प्रणालीतून दूर होणार आहे.
४० टक्के आपत्ती रायगड जिल्ह्यात
जंगलतोड, माती उत्खननामुळे रायगड जिल्ह्यात दरडीचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याचबरोबर पूर, उधाण, चक्रीवादळ, धबधब्यांमध्ये पर्यटक वाहून जाणे, धरणात, समुद्रात बुडून मृत्यू होणे यासारख्या आपत्तींत दरवर्षी भर पडते. खालापूर, महाड, पोलादपूर, अलिबाग, मुरूड या तालुक्यांमध्ये अशा आपत्ती दरवर्षी घडतात. आपत्ती व्यवस्थापनाच्या अहवालानुसार, राज्यात घडणाऱ्या एकूण आपत्तींपैकी ४० टक्के आपत्ती या रायगड जिल्ह्यातच घडतात. पावसाळ्यात याचे प्रमाण सर्वाधिक असल्याने बचावकार्य, मदत पुनर्वसन कार्य राबवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सक्षम असणे आवश्यक आहे.
महसूल सप्ताहानिमित्त मंगळवारपासून (ता.१) रायगड जिल्ह्यात अनेक उपक्रम राबवले जात आहेत. त्यात ‘डॅड’ प्रणाली ही राबविण्यात येणार आहे. यातून दरडग्रस्त गावांतील एकूण कुटुंबे, लोकसंख्या, त्यांची मालमत्ता, गाई-गुरे, मालमत्ता आदींची माहिती संकलित केली जात आहे. याचा फायदा प्रशासनाला मदतकार्यात होणार आहे, त्याचबरोबर दरडग्रस्तांच्या नातेवाइकांनाही होईल. मृत्यूनंतर मुलाबाळांचे काय होईल, ही चिंता कमी होईल.
- डॉ. योगेश म्हसे,
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.