
Latur News : या मंडळात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी बियाणे, खते, आंतरमशागत, फवारणी आदींसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. यात पावसाने या मंडळात सुरुवातीपासून अवकृपा दाखवली आहे. ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यातही पावसाची अत्यल्प नोंद आहे.
फळधारणेच्या अवस्थेत पिकांना पाण्याचा ताण बसत आहे. २५ टक्के अग्रिम पीक विमा देण्यासाठी झालेल्या सर्वेक्षणात उत्पादनात ६१ टक्के घट होणार असल्याची नोंद असून यात वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकरी हताश झाला असून त्यांच्यावर मोठे संकट घोंघावत आहे. दरम्यान अशा परिस्थितीत शेतकऱ्याला शासन आणि पीकविमा कंपनी कडून मोठ्या अपेक्षा आहेत.
उजनी (ता. औसा) मंडळात यंदाच्या खरीप हंगामात पावसाचे उशिरा आगमन झाले. जुलै महिन्याच्या शेवट पर्यंत येथील पेरण्या सुरूच होत्या. या भागात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकाचा पेरा झाला आहे. उसाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणावर आहे. जुलै महिन्यात झालेला मुर पाऊस पिकांना उगविण्यासाठी फायदेशीर ठरला.
परंतु ऑगस्ट महिना पूर्ण कोरडा गेल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. आतापर्यंत या मंडळात केवळ २०० मिमी पाऊस झाला असून हा पाऊस सरासरी पावसाच्या फक्त ४६ टक्के असल्याची माहिती मिळाली. या परिस्थितीत शेतकऱ्यांपुढे मोठे संकट असून भविष्यात जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न भेडसावणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.
शेतकरी अग्रिम पीक विम्याच्या प्रतीक्षेत
पावसाचा मोठा खंड पडल्यानंतर प्रशासनाकडून २५ टक्के अग्रिम पीक विमा रक्कम देण्यासाठी मंडळात १५० हेक्टर क्षेत्रावर सर्वे करण्यात आला. त्यावेळी उत्पादनात ६१ टक्के घट येणार असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी अग्रिम विम्यासाठी अधिसूचना देखील काढली. परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर २५ टक्के रक्कम जमा झाली नाही. यावरून शासनाने केवळ पिकांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तेरणा नदी कोरडीच !
उजनी गावालगत जाणारी तेरणा नदी अद्यापही कोरडी आहे. पावसाच्या सद्यस्थितीवरून नदी भरून जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भविष्यात नदीवर अवलंबून असणाऱ्या गावातील पिण्याच्या पाण्याचा त्याचबरोबर रब्बी हंगामात शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान या पाण्यावर अवलंबून असणारा रब्बी हंगामही धोक्यात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.