
Tomato News : मागच्या तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांना लाखो रूपये मिळवून देणारा टोमॅटो आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. किलोला १८० रुपये प्रमाणे असलेल्या टोमॅटोच्या दराला आता कवडीमोल भाव आला आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोला ८ रुपये किलो असा दर मिळत आहे. तर होलसेल मार्केटमध्ये ३ ते ५ रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
मागच्या महिन्यात सरासरी २६०० रुपये प्रतिक्रेट दराने विकला गेलेला टॉमेटो सध्या १०० रुपये प्रतिक्रेटवर आला आहे. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आला आहे. यामुळे दर नसल्याने शेतकऱ्यांनी टॉमेटो रस्त्यावर फेकून रोष व्यक्त केला.
टोमॅटोचे भाव वाढताच केंद्र सरकारने तत्परतेने टोमॅटो आयात करत वाढणाऱ्या दरावर अंकूश आणला. परंतु आता टोमॅटोच्या दरात घसरण होत असताना सरकार याकडे लक्ष देणार का? असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.
स्थानिक बाजारपेठेत भाव दिवसेंदिवस घसरत असून, राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला किलोमागे २ ते ५ रुपये बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारातच टोमॅटो फेकून संताप व्यक्त करत आहेत.
दरम्यान नाशिकच्या लासलगाव येथील बाजार समितीच्या आवारात एका शेतकऱ्याने दर नसल्याने टोमॅटो फेकून दिला. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक आणि मजुरी खर्चदेखील निघणे कठीण झाले आहे. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.
शेतकरी नेते अजित नवले यांनी केंद्राच्या धोरणावर टीका करत म्हणाले की, केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार सातत्याने शेतकरीविरोधी भूमिका घेत आहे. आपली शहरी वोट बँक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा सातत्याने बळी दिला जात आहे. आपल्या संकुचित राजकारणासाठी भाजपच्या राज्य आणि केंद्र सरकारने घेतलेल्या धोरणांचा परिणाम म्हणून राज्यात सर्वच शेतीमालाचे भाव कोसळले आहेत.
शेतकऱ्यांना आपला कांदा सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, आणि आता टोमॅटो यासह सर्वच शेतीमालाच्या भावात हस्तक्षेप करुन दर पाडण्यात आले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.