
नागपूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलन (Delhi Farmers Protest) मागे घेताना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केंद्र सरकारकडून करण्यात आली नाही. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा भारतीय किसान युनियनने (Bhartiya Kisan Union) दिला आहे.
त्याकरिताची रणनीती ठरण्याकरिता गुरुवारी (ता. २६) हरियानातील जिंद येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आंदोलनाच्या समर्थनार्थ याच दिवशी देशभरात ट्रॅक्टर मार्च (Tractor March) ही काढला जाणार आहे.
शेतीमालाच्या हमीभावाकरिता कायदा, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, जमीन अधिग्रहण कायद्यात शेतकऱ्यांचे होणारे शोषण थांबविणे, अशा विविध मागण्यांकरिता दिल्ली येथे तब्बल वर्षभर आंदोलन करण्यात आले होते.
शेतकऱ्यांच्या संघर्षापुढे झुकलेल्या केंद्र सरकारने अखेरीस शेतकऱ्यांच्या मागण्या सकारात्मक पद्धतीने सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र याला बराच कालावधी लोटल्यानंतर त्याची पूर्तता करण्यात आली नाही.
परिणामी, शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने एक प्रकारे शेतकऱ्यांचा विश्वासघात केला अशी भावना या पार्श्वभूमीवर निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या जशास तसे धोरणाला उत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलनाची धार तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
या वेळी होणाऱ्या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून हमीभाव कायदा मंजूर करून घेण्याचा निर्धार शेतकरी नेते राकेश टिकैत त्यांनी व्यक्त केला. या आंदोलनात देशभरातील सर्व राज्यातील शेतकरी सहभागी होणार आहेत. त्याकरिता समर्थन मिळवण्यासाठी विविध राज्यांमध्ये राकेश टिकैत यांच्या उपस्थितीत बैठका घेण्यात येत आहेत.
रविवारी (ता. २२) तमिळनाडू राज्यातील शेतकऱ्यांसोबत त्यांनी संवाद साधला. आता गुरुवारी (ता. २६) हरियानातील जिंदमध्ये शेतकरी संघटनांच्या विविध प्रतिनिधींची बैठक होणार आहे.
या बैठकीत आंदोलनाची निश्चित करण्यात येईल. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. २६) आपापल्या गावात ट्रॅक्टर मार्च काढावा असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्यावेळी दिल्लीत झालेल्या आंदोलनात पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, राजस्थान या भागांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते. ही राज्य दिल्लीच्या जवळ असल्याने तसे अपेक्षितदेखील आहे.
मात्र देशाच्या विविध भागांतील शेतकऱ्यांचा देखील या आंदोलनात कमी अधिक प्रमाणात सहभाग होता. या वेळच्या आंदोलनात देशाच्या इतर राज्यातील शेतकऱ्यांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असेही टिकैत यांनी सांगितले.
केंद्र सरकारने दिल्लीतील आंदोलन मागे घेताना हमीभाव कायदा लवकरच आणला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यासोबतच इतर प्रश्न सोडविण्यासाठी देखील सरकार सकारात्मक असल्याचे जाहीर केले. मात्र यातील एकही आश्वासनाची पूर्तता केंद्र सरकारने केली नाही. हा शेतकऱ्यांचा विश्वासघात असून, यापुढील काळात अधिक तीव्र आंदोलन केले जाणार आहे. त्याकरिता बैठक होणार आहे.
- राकेश टिकैत, समन्वयक, भारतीय किसान युनियन
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.