शेतातील ‘सुपर फूड्स’

वातावरणातील बदलास तग धरून येणारी भरडधान्य पिके आपल्यासाठी वरदान आहेत. भरडधान्ये ही उपयुक्त पोषण तत्त्वांनी समृद्ध असल्याने त्यांना ‘सुपर फूड्स’ असेही म्हटले जाते. या पिकांच्या विविध जाती, त्यांचे आरोग्य आणि प्रक्रियामूल्य लक्षात घेऊन संवर्धन आणि लागवड क्षेत्र वाढविण्याची गरज आहे.
Millet
MilletAgrowon
Published on
Updated on

भरड धान्य पिकांना पुरातन धान्य म्हटले जाते, कारण ऐतिहासिक पुराव्यानुसार हजारो वर्षांपूर्वी भरडधान्यांचा प्रवास हा आफ्रिकेतून आशिया खंड आणि युरोपमध्ये झाला. हडप्पा आणि मोहेंजोदडो संस्कृतीमध्ये अन्न म्हणून भरडधान्यांचा वापर केला जात असल्याचे पुरावे आहेत. भरडधान्ये ही उपयुक्त पोषण तत्त्वांनी समृद्ध असल्याने त्यांना ‘सुपर फूड’ असेही म्हटले जाते. हे लक्षात घेऊन भरडधान्य पिकांचे पर्यावरणीय आणि पोषणासंबंधी फायद्याचा प्रसार करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे.

भरडधान्य लागवड ही एक पीक पद्धती नसून त्यामध्ये पीकनिहाय आणि विभागनिहाय विविधता दिसते. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात नाचणी पिकात ज्वारी, तूर, उडीद, खुरासणी, अंबाडी, चवळी, काकडी, भेंडी या पिकांची देखील लागवड पाहायला मिळते. या पीक पद्धतीमुळे विविध प्रकारचे धान्य, चारा, भाजीपाला उपलब्ध होतो. भारतातील काही राज्यांमध्ये भरडधान्यांना देवधान्ये किंवा श्रीधान्ये (समृद्धी देणारे) म्हणतात. भरडधान्यामध्ये प्रामुख्याने मुख्य भरडधान्ये आणि लहान भरडधान्ये अशी वर्गवारी करतात. मुख्य भरडधान्यात ज्वारी, बाजरी आणि लहान भरडधान्यामध्ये नाचणी, वरई, राळा, सावा, कोदो, बोर्टी, ब्राउन टॉप मिलेट ही पिके येतात. भरडधान्य पिके डोंगराळ, उताराच्या जागेवर, हलक्या पोताच्या जमिनीत कोणतीही खते आणि कीडनाशकांच्या वापराशिवाय येतात. वातावरणातील बदलास तग धरून येणारी ही पिके वरदान आहेत. जगभरात तसेच भारतात भरडधान्य जागरूकतेवर मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. गेल्या काही वर्षांत ग्राहकांकडून भरडधान्यापासून तयार केलेल्या खाद्यपदार्थांचा वापर वाढला आहे. भारतीय भरडधान्य संशोधन संस्था, हैदराबाद याचबरोबरीने इक्रिसॅट, हैदराबाद, कृषी विद्यापीठ, धारवाड (कर्नाटक), तसेच राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये भरडधान्य पिकांच्या जाती, लागवड, पीक व्यवस्थापन, मूल्यवर्धनाबाबत विशेष संशोधन आणि तंत्रज्ञान प्रसाराचे काम केले जाते.

कमी होण्याची कारणे

भारताच्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारची भरडधान्यांचे उत्पादन घेतले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ज्या प्रकारे आपल्या देशात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्या त्या प्रमाणात गहू आणि भाताचे उत्पादन वाढू लागले. साधारण १९७०-७१ दरम्यान एकूण अन्नधान्य लागवडीपैकी ४५.९ टक्के भरडधान्य पिकांची लागवड होती. मात्र १९९६ च्या काळात हीच लागवड ३१.५ टक्क्यांवर आली.

धान्य वितरण व्यवस्थेत गहू आणि तांदूळ दिला जाऊ लागला, त्यामुळे देखील भरडधान्ये लागवड आणि आहारातून कमी होत गेली.गेल्या काही वर्षात काही भरडधान्य पिके आणि त्यांची विविधता नामशेष झाली आहे.

डोंगर उतारावरील जमिनीचे सपाटीकरण करून या जमिनी भात लागवडीखाली आल्या. भरडधान्य पिकांमध्ये देखील खोड किडा, पाने खाणारी अळी, कणीस पोखरणारी अळी तसेच करपा, तांबेरा, केवडा रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. जमिनीची धूप झाल्याने कस कमी झाला. याचा उत्पादनावर परिणाम दिसत आहे. ही पिके दुर्लक्षित राहिल्यामुळे विविध जातींच्या शुद्ध बियाण्यांची उपलब्धता कमी झाली आहे.

भरडधान्ये महत्त्वाची...

  • हलक्या, उताराच्या जमिनीत देखील लागवड शक्य.

  • काटक, तापमान सहनशील आणि पाण्याचा ताण सहनशील करणारी पिके.

  • रोग, किडीस प्रतिकारक, कमी पाण्यात देखील उत्पादनक्षम.

  • रासायनिक खते न वापरता सुद्धा उत्पादनक्षमता.

  • वातावरण बदलास तग धरण्याची क्षमता.

भरडधान्य संवर्धानामध्ये ‘बायफ’चे योगदान :

  • ‘बायफ’ तर्फे २००९ मध्ये जव्हार (जि. पालघर) येथे स्थानिक जाती, जंगली अन्न वनस्पतींचे संवर्धन आणि व्यवस्थापन कार्यक्रम सुरू झाला. यामध्ये स्थानिक जातींच्या विशेष गुणधर्मांचे संकलन, शास्त्रीय अभ्यास, बीजोत्पादन, सुयोग्य जातींची मोठ्या प्रमाणात लागवड आणि मूल्यवर्धन हे हेतू समोर ठेवण्यात आले होते.

  • एप्रिल, २०१४ पासून राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने आणि आयसर, पुणे  यांच्या समन्वयातून महाराष्ट्र जनुक कोश कार्यक्रमांतर्गत जव्हार (पालघर), अकोले (नगर),जुन्नर (पुणे), धडगाव (नंदुरबार), एटापल्ली (गडचिरोली) आणि कुडाळ (सिंधुदुर्ग) येथे विशेष प्रकल्प सुरू झाला. यामध्ये भात, नाचणी, वरई, राळा, मोर बंटी, वाल, घेवडा, मका, ज्वारी, चवळी, भाजीपाला पिके, कंद पिके, तेलबिया पिके तसेच जंगली भाज्या,जंगली फळे इत्यादीचे सर्व्हेक्षण, संवर्धन आणि उत्पादन असा कार्यक्रम राबविण्यात आला.

  • भरडधान्य पीक निहाय विविधता आणि त्याबाबतचे स्थानिक ज्ञान (अन्न पदार्थ, लागवड पद्धती, रोग व कीड, साठवणूक पद्धती, विविध सण यांचे दस्तऐवजीकरण.

  • ज्वारी, नाचणी, राळा, बर्टी, वरईच्या २५ जातींच्या गुण वैशिष्ट्यांचा शास्त्रीय अभ्यास पूर्ण. पोषण तत्त्वांचा अभ्यास सुरू आहे.

  • सुधारित लागवड पद्धत, सरी आणि वरंबा पद्धतीने लागवड करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न.

  • नाचणी आणि वरई पिकामध्ये गेल्या तीन वर्षांपासून कणीस निवड पद्धत वापरून ७५ पेक्षा जास्त नमुन्यांचे संकलन.

  • जव्हार, अकोले, धडगाव येथे सहा ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतावर संवर्धन केंद्राच्या माध्यमातून विविध पिकांच्या ७५ जातींचे संवर्धन.

  • इक्रिसॅट, हैदराबाद या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून नाचणीच्या ११२ प्रकारचे नमुने प्राप्त. जव्हार (पालघर) येथे यांची लागवड सुरू.

  • नाचणी (काळपेरी, शितोळी), वरई (दुध मोगरा, घोशी), राळा (पिवळा राळा) मोर बंटी अशा निवडक जातींचे बीजोत्पादन आणि प्रसार.

  • भरडधान्य पिकांच्या विविध खाद्यपदार्थांचा अभ्यास. स्थानिक पातळीवर महिला गट, अंगणवाडीमध्ये प्रशिक्षणाच्या माध्यमातून ६०० महिलांपर्यंत खाद्यपदार्थांचा प्रसार.

  • नाचणी, वरई, ज्वारी पिकांच्या ३५ जाती राष्ट्रीय पीक जनुकीय संस्थेमध्ये संवर्धनासाठी पाठविण्यात आले आहेत.

  • नंदुरबार येथील ज्वारीच्या पाच जातींना ‘पीपीव्ही आणि एफआरए’तर्फे याहा मोगी माता बियाणे संवर्धन समितीच्या नावे नोंदणीकरण.

  • भरडधान्याबद्दल जाणीव जागृती करण्यासाठी ग्रामीण आणि शहरी पातळीवर धान्य महोत्सव, प्रदर्शनाच्या माध्यमातून तीन हजार लोकांपर्यंत प्रसार.

भरडधान्य आणि सण उत्सवांचा परस्पर संबंध

देवाचे पीक ः नाचणी

पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजात नाचणीला देवाचे पीक म्हटले जाते. कारण अन्न सुरक्षा, पोषण सुरक्षेच्या दृष्टीने नाचणी पिकास अनन्य साधारण महत्त्व आहे. पिकांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत विविध सण साजरे केले जातात.

आखाती /अक्षय तृतीया

  • या सणाला बियाण्यांचा सण असेही म्हणतात. कारण यामध्ये बियाणे उगवण क्षमता तपासली जाते.

  • बांबूच्या टोपलीत सागाची पाने अंथरून त्यावर सुकलेले शेण खत,मातीचे मिश्रण पसरवले जाते. त्यानंतर नाचणी, वरई इत्यादी पिकांचे बियाणे गोलाकार पसरवले जाते. त्यावर पुन्हा माती आणि सुकलेले शेणाचा थर देवून पाणी शिंपडले जाते. त्यानंतर बांबूच्या टोपलीने झाकले जाते. ओलावा टिकवण्यासाठी वेळोवेळी पाणी शिंपडले जाते.

  • सात दिवसांनंतर घरातील महिला बांबूचे टोपले घेऊन मंदिरात जाते. उगवून आलेली रोपे देवाला वाहिली जातात. ज्या पिकांच्या बियाण्यांची उगवण उत्तम आणि रोपे जोमदार असतात, ते पुढील हंगामात लागवडीसाठी वापरले जाते.

कणसरी पूजा

  • ही पूजा पीक काढणीच्या वेळी केली जाते. त्या दिवशी घरातील महिला उपवास करते.

  • या पूजेला शेतातील नाचणीची कणसे आणून पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी कापणीस सुरुवात केली जाते.

  • त्याचबरोबर झोडणीच्या वेळी तीन दिवसांचा कार्यक्रम असतो. पहिल्या दिवशी घरात पारंपरिक गाणी ही घांगळीच्या तालावर म्हटली जातात.

  • पूजेच्यावेळी नाचणीचे छोटे ढीग जमिनीवर मांडले जातात. नाचणीचे लाडू आणि इतर पारंपरिक अन्नपदार्थांचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी पारंपरिक गाणी आणि पूजा केली जाते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी धान्य घरी आणले जाते.

संवर्धन आणि वृद्धीसाठी उपाययोजनांची गरज

  • महाराष्ट्रातील विभागनिहाय भरडधान्य पिके आणि विविधता, सद्यःस्थिती आणि स्थानिक ज्ञान यांचे दस्तऐवजीकरण महत्त्वाचे असून यासाठी प्राथमिक सर्व्हेक्षण गरजेचे.

  • महाराष्ट्रातील पीकनिहाय क्लस्टरची निर्मिती करून त्यामध्ये लागवड ते विक्री अशी साखळी तयार करण्याची गरज.

  • भरडधान्य संवर्धक, उत्पादक, मूल्यवृद्धी करणारे शेतकरी, संस्था आणि कंपन्यांना योग्य मदत करून प्रोत्साहनाची गरज.

  • वरई, राळा, मोरबंटी, हरिक या पिकांच्या प्रक्रियेसाठी गाव पातळीवर छोट्या यंत्रांचा प्रसार करून लघुउद्योगांच्या उभारणीची गरज.

  • शहरी आणि ग्रामीण पातळीवर भरडधान्याबद्दलची जाणीव जागृतीसाठी मिलेट महोत्सव, कार्यशाळा आणि चर्चासत्रांचे आयोजन.

  • शाळा, महाविद्यालयांच्या पातळीवर प्रकल्प राबवून जाणीव जागृतीची आवश्यकता.

  • एकात्मिक बाल विकास कार्यक्रमांतर्गत पोषण अन्नपदार्थ निर्मिती आणि आहारात वापर करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन.

  • कृषी विभाग,आदिवासी विभागाच्या पातळीवर विभागनिहाय प्रकल्प राबवून प्रत्यक्ष संवर्धन, बीजोत्पादन, लागवडीसाठी कार्यक्रमांची आखणी.

  • काही निवडक जातींचे भौगोलिक मानांकनासाठी विशेष प्रयत्न.

  • पोषण सुरक्षेसाठी मूल्यवृद्धी आणि विविध पदार्थ निर्मितीला चालना.

  • भरडधान्य संवर्धन, उत्पादन आणि विक्रीसाठी विशेष समितीची स्थापना करून दिशादर्शक कार्यवाहीची गरज.

  • ओडिशा, कर्नाटक राज्याच्या धर्तीवर ‘मिलेट मिशन’ योजना आखून कार्यवाहीची आवश्यकता.

पोषणमूल्यांचे भांडार

आहार तज्ज्ञ आपल्या आहारात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या धान्यांचा समावेश करायला सांगतात. याचे कारण म्हणजे, ग्लायसेमिक इंडेक्‍स कमी असलेले धान्य आपल्या शरीरामध्ये हळूहळू ग्लुकोज सोडतात. म्हणजेच एखादे धान्य खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये हळूहळू ऊर्जा सोडली जाते. आपल्या शरीराला मिळणारी ऊर्जा दिवसभर टिकते. यातून शरीरामध्ये साखरेची पातळी योग्य राखली जाते. म्हणून भरडधान्ये आरोग्यासाठी महत्त्वाची आहेत.

संजय पाटील ९६२३९३१८५५

डॉ. विठ्ठल कौठाळे ९९६०५३६६३१

(लेखक बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन, पुणे येथे वरिष्ठ प्रकल्प समन्यवयक म्हणून कार्यरत आहेत.)

ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा ही आमची परंपरागत पिके आता कमी होत चालली आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांच्या पातळीवर संवर्धन आणि शाश्‍वत वापर गरजेचा आहे.
पद्मश्री श्रीमती राहीबाई पोपेरे, अकोले, जि. नगर
ज्वारी हे विदर्भातील मुख्य पीक होते. पण आज मोजके शेतकरी पारंपरिक ज्वारी जातींची लागवड करतात. ज्वारी जातींच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. वातावरण बदल आणि पोषण सुरक्षा या दुहेरी संकटावर मात करण्यासाठी भरडधान्ये महत्त्वाची आहेत.
वसंत फुटाणे, गोपुरी, जि. वर्धा
मोरबंटी हे आमचे पारंपरिक पीक. सातपुडा भागात तीव्र उतार आणि निकृष्ट जमिनीत येणाऱ्या या एकमेव पिकाचे संवर्धन ही काळाची गरज आहे.
मोचाडा पावरा, धडगाव, जि. नंदुरबार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com