Solapur News : यंदाचा ऊस गाळप हंगाम उंबरठ्यावर म्हणजे अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. तरीही शेतकऱ्यांना मागील हंगामातील उसाच्या एफआरपीसाठी वाट पहात बसावे लागत आहे. अद्यापही सोलापूर जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची २०७ कोटी रुपये एफआरपी थकीत आहे.
गतवर्षी राज्यात २११ तर सोलापूर जिल्ह्यात ३७ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. गेल्या हंगामात राज्यात १०५३.९१ लाख टन, तर सोलापूर जिल्ह्यात २८२.२३ लाख टन उसाचे गाळप झाले होते. ३१ जुलै अखेरीसच्या अहवालानुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या एफआरपीचे अद्यापही ६७१.५३ कोटी रुपये अडकले आहेत. त्यांपैकी सोलापूर जिल्ह्यातील १४ कारखान्यांकडे २०६.९ कोटी रुपये थकीत आहेत.
शासनाच्या धोरणानुसार गाळप हंगाम सुरू असताना बेसिक रिकव्हरीप्रमाणे ऊस उत्पादकांना एफआरपीचा पहिला हप्ता तर हंगाम संपल्यावर १५ दिवसात इथेनॉल उत्पादनासाठी वापर झालेली साखर विचारात घेऊन अंतिम रिकव्हरी निश्चित करून दुसऱ्या हप्त्यात पूर्ण एफआरपी कारखान्यांनी शेतकऱ्यांना देणे अपेक्षित आहे. तथापि, सोलापूरसह अन्य जिल्ह्यात देखील सर्वच कारखान्यांकडून तसे झालेले दिसत नाही.
शेतकरी संघटनांनी थकीत एफआरपी संदर्भात साखर आयुक्तांची भेट घेऊन अशा कारखान्यांवर ‘आरआरसी’ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार साखर आयुक्तांनी एफआरपी थकवलेल्या कारखान्यांना नोटिसा पाठवून त्यांची नुकतीच सुनावणी घेतली आहे. एफआरपी मिळण्याबाबत शेतकरी व
कारखान्यांमध्ये करार झाल्याचे कारखाने सांगत आहेत, ही पळवाट शोधून कारखान्यांनी एफआरपी देण्यात चालढकल करत तीन ते चार टप्प्यात ती शेतकऱ्यांना देण्याचा फंडा काढला आहे. मात्र,कारखान्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून सह्या घेत असे करार केल्याचे शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जाला व्याज; थकीत एफआरपीला नाही व्याज
शेतकरी पीककर्ज काढून शेती करतो. त्यासाठी त्यांना व्याज मोजावे लागते. ऊस उत्पादकांना तर ऊस लागवडीसाठी घेतलेल्या कर्जापासून त्याचे पैसे हातात येईपर्यंत किमान दीड वर्षाचा कालावधी जातो.उसाचे गाळप झाल्यावर १५ दिवसात एफआरपी द्यावी.ती न दिल्यास १५ टक्के व्याजासह एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी, असा कायदा सांगतो.मात्र,कोणतेच कारखाने थकीत एफआरपी व्याजासह देताना दिसत नाहीत.
सोलापूर जिल्ह्यातील कारखानानिहाय थकीत एफआरपी (कोटीत)-
कारखाना थकीत एफआरपी
पांडुरंग १८.६७
सिद्धेश्वर ९.३४
सहकार महर्षी १०.५१
विठ्ठलराव शिंदे, पिंपळनेर १८.७६
मकाई २२.६८
सासवड माळी ५.७४
मातोश्री ६.०२
विठ्ठल रिफाइंड ४२.७८
विठ्ठलराव शिंदे, करकंब ५.४२
भीमा ३८.०६
सहकार शिरोमणी १९.६६
धाराशिव, सांगोला १.१५
श्री शंकर ७.१३
विठ्ठल, वेणूनगर ०.९८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.