
Pune News : महाराष्ट्र कृषिउद्योग विकास महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यात प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्यामुळे नाराजी पसरली आहे. त्यात पुन्हा कर्मचारी संघाने सामूहिक रजा आंदोलन छेडण्याची नोटीस दिली आहे.
कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत २२ जूनला पुण्यात बैठक झाली होती. त्यानंतर प्रशासन विभागाच्या उप महाव्यवस्थापकांनी पाच जुलैला दुसरी बैठक घेतली होती. ‘महिनाभरात कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविले जातील,’ असे आश्वासन या बैठकांमध्ये देण्यात आले. ‘‘दोन महिने उलटल्यानंतर देखील निर्णय न घेण्यात आलेला नाही. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे,’’ असे कर्मचारी संघाने महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
व्यवस्थापकीय संचालकांनंतर कृषिमंत्र्यांपर्यंत मुद्दे मांडले गेले. परंतु दोघांच्या चर्चेनंतर देखील समस्या सुटलेली नाही. विशेष म्हणजे महामंडळाचे अध्यक्षपद कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे आहे. ‘‘कृषिमंत्र्यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आढावा बैठक घेतली होती. त्यात कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा झाली. कृषिमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली. व्यवस्थापकीय संचालक व कृषिमंत्री दोघेही कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहेत. परंतु प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे वेळकाढू भूमिका घेणारा झारीतील शुक्राचार्य कोण, याचा शोध आता नव्या व्यवस्थापकीय संचालकाने घ्यावा,’’ असे कर्मचाऱ्यांनी संघाचे म्हणणे आहे.
दरम्यान, महामंडळातील काही मंडळींच्या भ्रष्ट साट्यालोट्यामुळे महामंडळाचे वाभाडे निघत आहेत. त्यामुळे काही अधिकारी अस्वस्थ झाले आहेत. महामंडळातील कर्मचारी वर्ग शेतकरी कुटुंबातून आलेला आहे. राज्याच्या ग्रामीण भागात कृषी उद्योगचे विविध उपक्रम राबविले जातात. गैरव्यवहारांच्या प्रकरणांमुळे ‘कृषिउद्योग’ची बदनामी होते आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, असेही मत कर्मचाऱ्यांची मांडले आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कृषिउद्योग विकास महामंडळात गाजत असलेल्या निविष्ठा खरेदी निविदांचा घोळ अजूनही मिटलेला नाही. राज्य शासनाने महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी डॉ. मंगेश गोंदावले यांची नियुक्ती केली आहे. कृषी उद्योगमध्ये आतापर्यंत कोणत्या घोटाळ्यांमध्ये कोण कोण दोषी आहेत याचा आढावा डॉ. गोंदावले यांनी घ्यावा, दोषी व्यक्तींवर कारवाई करावी. कृषी खात्यातील काही अधिकारी कृषी उद्योगचा वापर करीत गैरव्यवहार घडवून आणत आहेत. त्यातून होणाऱ्या बदनामीला आम्हाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पारदर्शक कारभाराबाबत डॉ. गोंदावले यांनी आता स्पष्ट भूमिका घ्यावी, अशीही मागणी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.