पुणे : पावसाळ्याचे जवळपास सव्वादोन महिने पूर्ण होत आले आहे. या कालावधीत कमीअधिक स्वरुपात पाऊस पडला आहे. धरण क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातील २६ धरणांपैकी आतापर्यंत जवळपास ११ धरणे भरली आहेत. सर्व धरणांत एकूण १७१.७७ टीएमसी म्हणजेच ८६ टक्के एवढा पाणीसाठा (Water Storage) झाला आहे. त्यामुळे शेतीचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.
यंदा जून महिन्यात कमी पाऊस झाला होता. त्यामुळे चालू वर्षी पुरेसा पडतो की नाही, अशी स्थिती झाली होती. परंतु ३० जूनच्या दरम्यान वातावरणात बदल होऊन पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्यानंतर एक जुलैपासून जोरदार पाऊस (Heavy Rainfall) पडण्यास सुरुवात झाली.
बुधवारी (ता. १०) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सर्व धरणांत ११.३४ टीएमसी एवढी नव्याने पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे तीन धरणे शंभर टक्के भरली असून, आठ धरणांत ९० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा (Water Storage) झाला आहे. या धरणातून कमीअधिक प्रमाणात डाव्या व उजव्या कालव्याला व विद्युतगृहासाठी आणि सांडव्याला पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
जिल्ह्यात एकूण धरणांची उपयुक्त पाणीसाठा (Water Storage) क्षमता ही १९८.३२ टीएमसी एवढी आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत या धरणांत १५५.१४ टीएमसी म्हणजेच ७८ टक्के एवढा पाणीसाठा झाला होता.
यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली आहे. सध्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांत पाण्याची आवक वाढली आहे. तर एक जूनपासून मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या धरणांत २९.९६ टीएमसी एवढा पाणीसाठा नव्याने दाखल झाला आहे.
नीरा खोऱ्यातील पवना, कासारसाई, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, वडीवळे, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर या धरणांत ४७.८६ टीएमसी, तर कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड या धरणांत ३९.४४ टीएमसी, याशिवाय उजनी ५६.९१ टीएमसी, मुळशी २१.४९ टीएमसी एवढा नव्याने पाणीसाठा दाखल झाला आहे.
यामुळे जिल्ह्यातील काही तीन धरणे भरली असून, उर्वरित काही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. काही धरणे भरली असल्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने मुठा, पवना, भीमा, आरळा, इंद्रायणी, कानंदी, कुकडी, मीना, कुकडी, घोड या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
बुधवारी (ता. १०) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला धरणक्षेत्रनिहाय पाऊस, मिलिमीटरमध्ये :
टेमघर १६०, वरसगाव १००, पानशेत ९०, खडकवासला १४, पवना ११०, कासारसाई ४३, कळमोडी ५१, चासकमान २७, भामा आसखेड १८, आंध्रा २८, वडीवळे ८४, शेटफळ १७, नाझरे १२, भाटघर ३४, नीरा देवघर १२४, वीर ७, पिंपळगाव जोगे २९, माणिकडोह २९, येडगाव २७, वडज २५, डिंभे २७, चिल्हेवाडी १९, घोड १७, विसापूर १५, उजनी १६, मुळशी २५४.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.