
Nagpur News : राज्यात वन्यहत्तींची संख्या वाढत आहे. त्यांचा वावर नियंत्रित करून संवर्धनासाठी व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात दोन ठिकाणी हत्ती प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. गडचिरोली- गोंदिया जिल्ह्यात नवेगाव आणि कोकणात सिंधदुर्ग परिसरात हे हत्ती प्रकल्प साकार होतील.
हत्ती ही भारतातील सर्वात मोठी आणि धोकाग्रस्त प्रजाती आहे. ते ज्या जंगलात आणि गवताळ प्रदेशात राहतात त्यांचा पर्यावरणीय समतोल राखण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतात. २०१७ च्या हत्ती गणनेनुसार भारतात २९ हजार ९६४ हत्ती आहेत. त्यांचे क्षेत्र सध्या २२ राज्यात विस्तारले आहे. आता महाराष्ट्राचाही समावेश त्यात होऊ लागला आहे.
राज्यात २० ते २५ हत्ती आहेत. छत्तीसगडला लागून असलेल्या गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत सध्या त्यांचे अस्तित्व आहे. हे हत्ती छत्तीसगडमधून नवीन अधिवास शोधत स्थलांतरित झाले आहेत. यामुळे नवीन आव्हान उभे राहिले आहे. त्यांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. हे प्रकल्प झाल्यास हत्तींचे दीर्घकालीन अस्तित्व सुनिश्चित करता येईल.
राज्यात हत्ती स्थिरावले
पूर्व विदर्भात २०१९ मध्ये दोन हत्तींनी छत्तीसगड राज्यातून गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात हजरा फॉलजवळ प्रवेश केला. त्यांचा मुक्काम दोन ते तीन दिवस होता. त्यानंतर २०२१ मध्ये २० ते २३ हत्तींचा कळप छत्तीसगडवरुन गडचिरोली जिल्ह्यात आला.
त्या कळपाने गडचिरोली, वडसा प्रादेशिक विभागात भ्रमंती केली. त्यानंतर २०२२ पर्यंत हे हत्ती पुन्हा छत्तीसगडमध्ये गेले. आता पुन्हा ते हत्ती गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात स्थिरावले आहेत. त्यामुळेच नवेगाव हत्ती प्रकल्पाला वेग आला आहे. ४ हजार चौरस किलोमीटर मध्ये हा प्रकल्प साकारणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.