
रब्बीचा हंगाम (Rabbi Season) सुरू झाल्याने देशभरातील शेतकऱ्यांनी पेरणीची (Wheat Sowing) काम लवकर सुरू केली आहेत. मागील काही वर्षांपासून हवामान बदलामुळे (Climate Change) उष्णतेच्या लाटा (Heat Wave) येऊन पिकांवर त्याचा नकारात्मक परिणाम होतोय. लवकर पेरणी केल्यामुळे या उष्णतेच्या लाटेपासून बचाव करणे शक्य होते. त्यामुळे यंदा गव्हासह प्रमुख रब्बी पिकांची लागवड लवकर सुरू झाली आहे.
यंदाच्या रब्बी हंगामात आतापर्यंत 54 हजार हेक्टरवर गव्हाची लागवड झाली असून बहुतांश लागवड ही उत्तरप्रदेश मध्ये झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तिथे 34 हजार हेक्टर क्षेत्रावर गव्हाची लागवड करण्यात आली होती. यावर्षी उत्तरप्रदेशात खरीपाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यात पावसाने ओढ दिली होती. तर सप्टेंबरमध्ये आणि ऑक्टोबरच्या पहिल्या दहा दिवसांत राज्यात अतिवृष्टी झाली.
भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) माजी कृषी शास्त्रज्ञ एस के सिंग म्हणाले, "पावसाचं पाणी आटताच शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी सुरू केली आहे. रब्बीचा हंगाम सुरू झाल्या झाल्याच पेरण्या सुरू झाल्यामुळे पिकं मार्च महिन्यात काढणीला येतील. म्हणजे हवामान बदलामुळे जे तापमान वाढतंय त्याचा फटका बसणार नाही. हरियाणा आणि पंजाबच्या शेतकऱ्यांनी नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत पेरण्या पूर्ण कराव्यात म्हणजे त्यांची पीक वेळेवर काढणीला येतील."
रब्बीचं मुख्य पीक असलेल्या गव्हाची पेरणी साधारणपणे नोव्हेंबरमध्ये सुरू होते आणि मार्च-एप्रिलमध्ये पिकं काढणीला येतात.
गुजरात आणि मध्यप्रदेशातील अनेक भागात ऑक्टोबर महिन्यातच गव्हाची लागवड केली जाते, त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत इथली पिकं लवकर काढणीला येतात. उत्तराखंड, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्येही गव्हाची पेरणी सुरू झाली आहे.
जुलै 2021 ते जून 2022 या पीक वर्षात उष्णतेची मोठी लाट आल्यामुळे गहू उत्पादनात मोठी घट झाली होती.
रब्बीचं एकूण सर्वसाधारण क्षेत्र 633.8 लाख हेक्टर इतकं आहे. या वर्षी 28 ऑक्टोबरपर्यंत 37.75 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आल्याची नोंद आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या कालावधीत पेरा 39 टक्के वाढला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.