
Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागात रविवारी (ता. ३) पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे जिल्ह्यातील भातपिकावरील संकट टळले आहे. असे असले तरी किनारपट्टीवरील तालुक्यांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान वैभववाडी, कणकवली तालुक्यांत पावसाचा जोर अधिक असून नद्यांच्या पाणीपातळीतदेखील वाढ झाली आहे. दरम्यान सोमवार (ता. ४) सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे.
ऑगस्टमधील दोन-तीन दिवसांचा अपवाद वगळता संपूर्ण महिना कोरडा गेला. पावसाअभावी जिल्ह्यातील मुख्य भातपीक संकटात सापडले होते. भरडी जमिनीतील पिके अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली होती. काही भागांत तर करपा, कडीकरपाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांत चिंता होती.
‘एलनिनो’च्या प्रभावामुळे पाऊस अनियमित झाला होता. त्यामुळे दुष्काळाचे सावट जिल्ह्यावर घोंघावत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. भातपीक लागवड केलेल्या स्थितीतच अजूनही दिसून येत आहे. काही भागात तर भातपिकांची वाढच खुटंली आहे.
पावसाअभावी सर्वत्र विदारक चित्र तयार झाले आहे. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अशात जिल्ह्यात बहुतांश भागांत रविवारी सायकांळी पावसाच्या सरी सुरू झाल्या. दुपारी तीननंतर वैभववाडी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यांत जोरदार सरी कोसळल्या.
त्यामुळे भातपिकांवरील संकट तुर्तास टळले आहे. जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यात दमदार सरी कोसळत असल्या तरी किनारपट्टीच्या तालुक्यांत अजूनही पाऊस पडलेला नाही. या भागात कडक ऊन पडले होते. त्यामुळे या तीनही तालुक्यांतील शेतीचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिके पावसाअभावी करपू लागली आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.