Amravati News : शाश्वत आणि हमखास उत्पन्न देणारे पीक असलेल्या मूग, उडदाला वातारणातील बदलाच्या परिणामी कधी कमी तर कधी जादा पावसाचा फटका बसत आहे. त्यामुळेच अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत या पिकाखालील क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठी घट नोंदविण्यात आली आहे. यंदा सरासरीच्या तुलनेत मुगाची अवघ्या २०.७ टक्के क्षेत्रावरची पेरणी झाली आहे.
नगदी आणि चांगला परतावा मिळवून देणारे म्हणून विदर्भातील आणि त्यातही अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची मूग आणि उडदाला पसंती राहते. मुगाचे अवघ्या ७० दिवसांचे पीक असून, जून महिन्यात याची लागवड होते. ३० जूननंतर शिफारशीत नसल्याने उशिरा लागवड झाल्यास उत्पादकता प्रभावीत होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
अमरावती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती या पाच जिल्ह्यांत मुगाखाली सरासरी ६९ हजार ५६९ हेक्टर क्षेत्र आहे. यंदा मात्र त्यातील अवघ्या १४ हजार ३७५ हेक्टरवरच लागवड झाली आहे. याची टक्केवारी अवघी २०.७ इतकी कमी आहे.
उडदाचे क्षेत्र याच पाच जिल्ह्यांत सरासरी ६३ हजार ४२५ इतके असून, त्यातील १३ हजार ९७६ हेक्टरवरच यंदा पेरणी झाली आहे. याची टक्केवारी २२ इतकी आहे. जून महिन्यात पावसाने खंड देणे आणि पीक काढणीच्यावेळी धो-धो बरसणारा पाऊस त्यामुळे गेल्या काही वर्षांत लागवड खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे.
त्यामुळेच शेतकऱ्यांनी या पिकाखालील क्षेत्र कमी केल्याचे सांगितले जाते. पूर्वी पीक न आल्यास हिरवळीचे खत म्हणून वापर होत होता. आता मात्र काहीच हाती लागत नसल्याने शेतकऱ्यांनी या पिकाचा पिच्छाच सोडला आहे.
...असे आहे मुगाखालील सरासरी आणि लागवड क्षेत्र (हेक्टरमध्ये)
अकोला ः १७,६१५ (१९७०)
अमरावती ः १५,७२९ (१,०७३)
बुलडाणा ः २०,४०६ (७४१५)
वाशीम ः ७,८९७ (१,६५९)
यवतमाळ ः ७,९२२ (२,२५८)
...असे आहे उडदाखालील सरासरी आणि लागवड क्षेत्र (हेक्टरमध्ये)
अकोला ः ११,४६० (१,७१५)
अमरावती ः ११,४४९ (५,४९)
बुलडाणा ः २२,६९७ (७,५५०)
वाशीम ः१०,४९१ (१,९९३)
यवतमाळ ः ७,३२८ (२,०८०)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.