
Drought Crisis in Maharashtra Sugar Production : यंदा पावसाने चांगलीच दडी मारल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा आतापासूनच बसत आहेत. दरम्यान महाराष्ट्रात सर्वाधिक उसाचे उत्पादन घेतले जाते परंतु यंदा कमी पावसाने कोल्हापूर वगळता राज्यातील ऊस पट्ट्यात परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. दरम्यान सोलापूर आणि मराठवाड्यात जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी चाऱ्यासाठी ऊस कापून घालण्यास सुरूवात केली आहे.
जनावरांना ऊस कापून घालण्याचे काम सुरू झाल्याने त्याचा सर्वाधिक विपरीत परिणाम आगामी साखर हंगामावर होण्याची शक्यता आहे. दरम्यान याबाबत साखर उद्योगातील तज्ज्ञांनीही असा अंदाज व्यक्त केला आहे. येत्या हंगामात राज्यातील साखरेचे उत्पादन यंदाच्या १०५ लाख टनांवरून ९० लाख टनांपर्यंत येण्याची शक्यता आहे. याबाबत चिनी मंडीने वृत्त सादर केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात यंदा समाधान कारक पाऊस झाल्याने धरणेही भरले आहेत. तसेच जिल्ह्यात सिंचनाची व्यवस्था चांगली असल्याने अद्यापही दुष्काळाच्या झळा कोल्हापूरला बसत नसल्याचे दिसून येत आहे. सध्या जनावरांच्या चाऱ्याची समस्या नाही, मात्र राज्यात इतर ठिकाणी ऊस कापून दुसऱ्या जिल्ह्यात नेत असल्याच्या घटना समोर येत आहेत.
सोलापूरसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांनी चाऱ्यासाठी ऊस पिकाची विक्री सुरू केली आहे. सरकारने जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यासाठी तातडीने पावले उचलली नाहीत, तर राज्यातील साखर कारखान्यांना गाळपासाठी उसाची तीव्र टंचाई निर्माण होऊ शकते.
२०२१-२२ मध्ये महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन १३७ लाख टन होते. यंदा ते १०५ लाख टनांवर आले. २०२३-२४ च्या हंगामात महाराष्ट्रासह कर्नाटकातील ऊस पट्ट्यात पाऊस न पडल्याने उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (WISMA) ने ऑगस्ट २०२३ मध्ये महाराष्ट्रातील ऊस उत्पादनात १५ टक्क्यांनी घट होऊन १०३ लाख टनांवर जाण्याचा अंदाज वर्तवला होता. WISMA सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन नवीन अंदाज जाहीर करण्याची शक्यता आहे.
दरम्यान AgriMandi.live कडून राज्यातील पावसाची सद्यस्थिती, पिकांची वाढ आणि भविष्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये यंदाच्या हंगामात महाराष्ट्रात ९० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवला आहे.
दरम्यान वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी चीनीमंडी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पावसाअभावी परिस्थिती गंभीर होत आहे. जून महिन्यापासून अपेक्षित पाऊस न झाल्याने उसाची वाढ खुंटली असून त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. भविष्यात पाऊस न पडल्यास राज्यातील ऊस उत्पादनात २५ टक्के घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्य सरकारने तातडीने चारा छावण्या सुरू केल्यास जनावरांच्या चाऱ्यासाठी उसाचा वापर काही प्रमाणात थांबू शकतो. तर साखर हंगाम १५ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान सुरू करावा लागेल, कारण साखर हंगाम सुरू होण्यास उशीर झाल्यास चाऱ्यासाठी अधिक उसाचा वापर होऊ शकतो.
याचा थेट परिणाम साखर कारखान्यांच्या गाळपावर होऊ शकतो. साखर कारखान्यांना पूर्ण क्षमतेने गाळप करता आले नाही तर साखर आणि इथेनॉलचे उत्पादन घटू शकते, तसेच कारखान्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होऊ शकते असे ठोंबरे यांनी मत व्यक्त केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.