
Mumbai News : सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यातच ठाण्यात जलबोगद्याला लागलेल्या गळतीमुळे मुंबईत १५ टक्के पाणी कपात सुरू असल्याने नागरिक हैराण आहेत. यंदा कमी पावसाचा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तवला आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिकेने आतापासूनच पारंपरिक स्त्रोतांचा शोध सुरू केला आहे.
मुंबईतील पाण्याचे नैसर्गिक स्रोत नष्ट झाले; तर काही स्त्रोत प्रदूषणाच्या विळख्यात असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले होते. याची दखल घेऊन केंद्रीय पर्यावरण मंत्रालय ‘राष्ट्रीय तलाव संवर्धन कार्यक्रम’ राबवत आहे.
या नैसर्गिक साठ्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने सरकारी पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली आहे. त्याच अनुषंगाने मुंबईतील पारंपरिक स्त्रोतांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
सीप्झ, मरोळ, अंधेरी, मार्वे आणि मढ जेट्टी या ठिकाणी असणाऱ्या छोट्या तलावांवर अतिक्रमणे झाली आहेत. काही तळ्यांमध्ये रसायनयुक्त पाणी सोडल्याने त्यातील पाणी दूषित झाले. मुंबईतील अनेक विहिरींना झपाट्याने होणाऱ्या विकासामुळे मूठमाती मिळाली; तर काही विहिरी पुनर्विकासात बुजल्या.
पाणीटंचाई जाणवू लागल्यास विहिरींची पुनर्रचना करण्यावर भर दिला जातो; मात्र आता पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पारंपरिक स्त्रोत सुरू करण्यावर भर देण्यात येत आहे. मुंबईत सुमारे ८६ तळी आणि छोटे तलाव असून, त्यामधील १२ शहरांत, ४४ पश्चिम उपनगरांत, तर ३० पूर्व उपनगरांत आहेत.
कमी पाऊस पडल्यास...
मुंबईत जलबोगद्याच्या गळतीमुळे १५ टक्के पाणी कपात लागू आहे; मात्र सुमारे ५० टक्क्यांपर्यंत पाणीकपातीच्या झळा मुंबईकर सहन करीत आहेत. यंदा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, असमाधानकारक पाऊस पडल्यास आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्यास पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांची मुंबईसाठी गरज भासणार आहे. त्यामुळे पालिकेच्या जलअभियंता विभागाने नैसर्गिक जलस्त्रोतांचा शोध सुरू केला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.