
Mumbai News : कर्नाटक विधानसभा निकालानंतर मनोबल वाढलेल्या महाविकास आघाडीमध्ये आतापासूनच मतभेद वाढू लागले आहेत. लोकसभेच्या जागा कोण, किती लढविणार यावरून काँग्रेस आणि शिवसेनेत कुरबुरी सुरू झाल्या आहेत.
मागील लोकसभा निवडणुकीत १८ खासदार असल्याने आम्ही तितक्याच जागा लढवू, असा दावा संजय राऊत यांनी व्यक्त केल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.
तर काँग्रेसने लोकसभा निवडणूक एकत्र लढवू, मात्र मुंबई महानगरपालिकेत स्वतंत्र लढवू, असा सूर आळवल्याने महाविकास आघाडीतील कुरबुरी समोर आल्या आहेत.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आतापासून जागा वाढवून घेण्यासाठी दबावतंत्र सुरू केले आहे. तर तुम्हाला आमची मुंबई महापालिकेत गरज असेल, तर लोकसभेच्या निवडणुकीत सन्मानाने जागावाटप व्हावे, असा अप्रत्यक्ष इशारा काँग्रेसने दिला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश आल्याने पक्षात उत्साह संचारला आहे. मात्र केवळ उत्साहावर निवडणूक लढविता येणार नाही. महाराष्ट्रात काँग्रेस कमकुवत झाली असून, एकदिलाने लढणारे नेते नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा कारभार ‘एकला चलो रे’ अशा खाक्यात सुरू आहे.
काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, भाई जगताप यांच्यासारख्या नेत्यांशी पटोले यांचे फारसे जमत नाही. या नेत्यांपलीकडे काँग्रेसचे बळ दिसत नाही. तरीही पटोले यांचे या नेत्यांशी फारसे जमत नसल्याने नेमके निर्णय कोण घेणार, याबाबतही संभ्रम आहे. मध्यंतरी पटोले आणि वडेट्टीवार यांच्यात जाहीर कलगीतुरा रंगला होता. त्यामुळे केवळ कर्नाटक विजयाच्या जोरावर इथे लढता येईल, अशी शाश्वती नाही.
राष्ट्रवादीची जोरदार तयारी
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा म्हणून शिक्कामोर्तब करण्यात यशस्वी झालेल्या शरद पवार यांनी महाविकास आघाडीची सूत्रे हाती घेतली आहेत. कर्नाटक निकालानंतर महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक घेऊन लोकसभेचे रणशिंग फुंकले आहे.
लोकसभेला जेथे पराभव झाला आहे, तेथे जोरदार तयारीच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जागावाटपासाठी प्रत्येक पक्षाच्या दोनच नेत्यांना समितीत स्थान देऊन संभाव्य तिढा बऱ्यापैकी सोडविण्यात पवार यशस्वी झाले आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांच्या नावावर चर्चा करून एक पाऊल पुढेही टाकले आहे.
ठाकरे हाच चेहरा
सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांना प्रचंड सहानुभूती मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे गट कितीही अवसान आणत असला, तरी न्यायालयाने ओेढलेले ताशेरे पाहता, शिंदे गटाची पुरती नाचक्की झाली आहे. भाजपही उसने अवसान आणून ठाकरेंवर कितीही टीका करत असला, तरी ठाकरे आपल्या पद्धतीने राजकारण करीत आहेत.
ठाकरेंवर होणारी टीका सहानुभूतीत बदलत असल्याचे खुद्द भाजपचे नेते मान्य करत आहेत. मंत्रालयातील अधिकारीही याला पुस्ती जोडतात. तरीही आता मागे फिरणे भाजप आणि शिंदे गटाला अवघड आहे, शिवाय मागे फिरल्यास कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण होऊन अधिक नुकसान होईल, असेही नेते बोलून दाखवतात. खुद्द शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री आता उद्धव ठाकरेंवर खासगीत चांगले बोलू लागले आहेत हे विशेष.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.