Team Agrowon
केंद्राने ६० लाख टन साखर निर्यातीची (Sugar Export) दिलेली परवानगी ही अंतिम परवानगी नसून साखरेची मे नंतरची परिस्थिती पाहून निर्यातीला पुन्हा परवानगी मिळू शकते, असा निर्वाळा केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने निर्यातीचे धोरण (Sugar export Policy) जाहीर केल्यानंतर दिला आहे.
केंद्राने यंदाचे साखर निर्यात धोरण जाहीर करण्यास हंगाम सुरू झाल्यानंतर जवळजवळ महिनाभर उशीर केला. त्यातच खुल्या पद्धतीने निर्यातीस परवानगी दिली नाही.
असे असतानाही मे पर्यंत ६० लाख टन इतक्या मर्यादित स्वरूपात साखर निर्यातीस परवानगी दिली.
साखर साठा संभाव्य विक्री आणि दर याबाबतचा तपशील मागवल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
गेल्या वर्षी ११२ लाख साखर निर्यात झाली होती. जून-जुलैमध्ये पावसाळी हवामानामुळे साखर निर्यातीस अडथळे येत असल्याने या दोन महिन्यात साखर निर्यात कमीच होते.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर निर्यातीस कमी परवानगी मिळणार, हे निश्चित आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने मे नंतर निर्यातीस परवानगी मिळू शकते, असे सांगितले आहे.