Pune News : पावसाने दांडी मारल्याने दौंड तालुक्याला दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. पाण्याअभावी जिरायतीसह बागायती भागातील पिकांना मोठा फटका बसत आहे. पावसाळ्यामध्ये दुथडी भरून वाहणाऱ्या मुळा, मुठा तसेच भीमा नदीला या वर्षी एकदाही पूर न आल्याने तालुक्यातील शेतकरी लांबलेल्या पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत.
लांबलेल्या पावसाने मुळा मुठा व भीमा नदीचे पाणी पातळी कमी झाल्याने शेतकरी आपल्या विद्युत पंपापासून शेतीला पाणी पुरावे म्हणून पाइप नदीपात्रामध्ये लांबवताना दिसत आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी नदीला पूर येत असल्यामुळे दोन-तीन महिने नदीपट्ट्यातील विद्युत पंप हे पाइपपासून वेगळे करून सुरक्षित ठिकाणी ठेवले जातात.
पावसाच्या पाण्यामुळे शेतीला पाण्याची गरज पडत नाही. मात्र या वर्षी शेतकऱ्यांना विद्युत पंप काढण्याची वेळ आलीच नाही. याउलट ऐन पावसाळ्यामध्ये दिवसभर ऊन पडत असल्याने तीव्र उन्हाळ्याचा झळा जाणवत आहेत.
भरीस भर म्हणून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे शेतातील पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची रात्रंदिवस धावपळ करावी लागत आहे. दौंड तालुक्यात या वर्षी १४,८२० हेक्टर उसाची लागवड झाल्याचे दौंड तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी सांगितले.
कमी पावसामुळे ऊस उत्पादन घटणार
दौंडमध्ये दरवर्षी ५० लाख टन उसाचे उत्पादन होते. यावर्षी कमी पावसामुळे उत्पादन घटणार आहे. परंतु पाऊस न झाल्याने आतापासूनच या उभ्या ऊस पिकाला जनावरांच्या चाऱ्यासाठी मागणी वाढली आहे. दरवर्षी दौंड तालुक्यातील गुऱ्हाळे ऐन पावसाळ्यात बंद असतात. विजयादशमीच्या मुहूर्तावर ही गुऱ्हाळे सुरू होतात. यावर्षी पाऊसच नसल्याने खंड न पडता गुऱ्हाळे चालू आहेत.
गो शाळेत गाई दाखल करण्याची वेळ
पाऊस लांबल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या गाई सांभाळण्यासाठी चौफुला (ता.दौंड) येथील बोरमलनाथ गो शाळेला दिल्याची माहिती गो शाळेचे प्रमुख कैलास शेलार यांनी दिली. यापूर्वी भटक्या गायी गो शाळेत दाखल केल्या जायच्या. या वर्षी प्रथमच शेतकऱ्यांच्या गोठ्यामधील गाई गो शाळेत दाखल होत असल्याने दुष्काळाचे विदारक चित्र ग्रामीण भागामध्ये दिसत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.