Kolhapur Kharif Season : खरीप पिकांना धोका! धरणांच्या पाण्याच्या नियोजनाबाबत पालकमंत्र्यांनी केल्या सूचना

Deepak Kesarkar : कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दूधगंगा व अन्य धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्या.
Kolhapur Kharif Season
Kolhapur Kharif Seasonagrowon

Kolhapur News : यंदा राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांत दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे खरीपाच्या पिकांना धोका पोहोचण्याची शक्यता जास्त आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दूधगंगा व अन्य धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा, वारणा, राधानगरी व तुळशी या धरण प्रकल्पांच्या पाण्याच्या नियोजनासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात घेण्यात आली.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार पी.एन.पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री केसरकर म्हणाले की, यंदा पहिल्यांदाच खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्यामुळे उभ्या पिकांसाठी पाण्याची मागणी होत आहे. याचबरोबर हवामान खात्याचा अंदाज विचारात घेऊन खरीप हंगामात पुढील ८ दिवसात आवर्तन द्यावे.

तसेच संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा विचार करुन जिल्ह्यात टंचाई परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी पाण्याचा वापर कमीत कमी करुन पाण्याची बचत करावी, असे आवाहन केसरकर यांनी केले.

दूधगंगा धरणाची गळती व दुरुस्तीबाबतच्या प्रस्तावास लवकरात लवकर मंजूरी मिळण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नादुरुस्त कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. याबरोबरच जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन वाया जाणाऱ्या पाण्याचा वापर करण्यासाठी उपाययोजना करा असेही ते म्हणाले.

नद्यांची वहनक्षमता वाढवण्यासाठी तसेच पूर नियंत्रणासाठी नदीतील गाळ काढून खोलीकरण करा. पंचगंगा नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी राजाराम बंधा-याला केलेल्या बरग्यांच्या व्यवस्थेप्रमाणे इतर बंधाऱ्यांनाही उपाययोजना करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.

दूधगंगा धरणाच्या गळतीचा अहवाल सादर करा

दूधगंगा धरणाची गळती व धरणातील पाणीसाठा आणि पाण्याच्या मागणीबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या. तसेच पाण्याच्या पुनर्वापराचे नियोजन करण्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील चिकोत्रा, नागणवाडी व आंबेओहोळ प्रकल्पांच्या पाणी नियोजनाच्या बैठका तातडीने घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

सध्या दूधगंगा धरणात २०.०९ मिली म्हणजे ८४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यापैकी १०.७८ टीएमसी पाणी दूधगंगा खोऱ्यातील डावा, उजवा कालवा व नदीद्वारे सिंचनासाठी उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

Kolhapur Kharif Season
Gokul Milk Kolhapur : गोकुळच्या दूध वाहतूक टेम्पोमधून व्हायची दुधाची चोरी, असा लागला छडा

तसेच धरणातून कोल्हापूर शहरासाठी २ टीएमसी व पंचगंगा खोऱ्यातील सिंचनासाठी ३.०२ टीएमसी पाणी वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच कर्नाटक राज्याच्या वाट्याच्या ४ टीएमसी पाण्यापैकी २.८७ टीएमसी पाणी कर्नाटक राज्याला दिले जाणार आहे.

सिंचनासाठी खरीप हंगामासाठी १ तर रब्बी व उन्हाळी हंगामासाठी प्रत्येकी ४ अशी एकूण ९ आवर्तने कालवा व नदीद्वारे देण्यात येणार आहेत. या पाण्याद्वारे राधानगरी, करवीर, हातकणंगले, शिरोळ, कागल व भुदरगड या तालुक्यातील सुमारे ६१ हजार हेक्टर पीक क्षेत्राला पाणी दिले जाणार आहे, अशी माहिती म्हेत्रे यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com