Crop Damage : दोन जिल्ह्यांत १६ हजार ३५ हेक्टरवर नुकसान
Crop Damage News छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हातातोंडाशी आलेल्या रब्बी पिकांसह काही फळ पिकांचे नुकसान (Crop Damage) करणे सुरूच ठेवले आहे.
प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर व नांदेड या दोन जिल्ह्यांत पाच दिवसांत जवळपास १६ हजार ३५ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार १४ मार्चपासून मराठवाड्यातील विविध भागांत अवकाळी पावसाचे संकेत देण्यात आले होते. ते संकेत खरे ठरत असून, विजांचा कडकडाट, वादळ व गारपिटीसह पडणाऱ्या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या रब्बी पिकांसह फळ पिकांचे व उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान करणे सुरू ठेवले आहे.
प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७७६२.५० हेक्टरवरील जिरायत पिकाचे अवकाळी पावसाने अंदाजे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान केले आहे.
याशिवाय नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाचा प्रकोप थोडा जास्त असून, या जिल्ह्यातील ८२७३ हेक्टरवरील शेती पिकाला अंदाजे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीचा सामना करावा लागला आहे.
नांदेड जिल्ह्यात नुकसान झालेल्या या क्षेत्रामध्ये १५०० हेक्टर जिरायत, ४८४२ हेक्टर बागायत व १९३१ हेक्टरवरील फळपिकाच्या झालेल्या नुकसानीचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
६ जणांचा मृत्यू ३६ जखमी
मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत १४ ते १८ मार्च या कालावधीत आलेल्या नैसर्गिक आपत्तीत सहा जणांचा मृत्यू झाला असून, ३६ जण जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये परभणीतील पाच व लातूरमधील एकाचा समावेश आहे. जखमींमध्ये नांदेडमधील ३१, परभणीतील ४ व बीडमधील एकाचा समावेश आहे.
४३ जनावरांचाही मृत्यू
पाच दिवसांपासून या नैसर्गिक आपत्ती दरम्यान परभणी वगळता सात जिल्ह्यांतील ४३ लहान मोठ्या जनावरांचाही मृत्यू झाला आहे. मृत जनावरांमध्ये ३५ मोठ्या व ८ लहान जनावरांचा समावेश आहे.
मृत मोठ्या ३५ जनावरांमध्ये छत्रपती संभाजीनगर, लातूर व धाराशिवमधील प्रत्येकी एक, बीडमधील ८, हिंगोलीतील दोन, जालन्यातील तीन व नांदेडमधील सर्वाधिक १९ जनावरांचा समावेश आहे.
दुसरीकडे मृत पावलेल्या ८ लहान जनावरांमध्ये नांदेडमधील ६ व बीडमधील २ जनावरांचा समावेश असल्याची माहिती विभागीय महसूल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.