
Pune News : पुणे जिल्ह्याच्या पूर्वेकडील बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर, हवेली, खेड भागांत पावसाअभावी खरीप हंगाम वाया जाण्याचा मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
अनेक ठिकाणी पिकाची वाढ खुंटली असून, विहिरींनीही तळ गाठला आहे. जिरायती भागासह बागायती भागातील शेतकऱ्यांनी उसनवारी करून पेरणी केली आहे. मात्र पदरी नुकसान आल्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यात खरिपाचे एक लाख सरासरी ९५ हजार ७१० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी आतापर्यंत एक लाख ४० हजार ८८८ हेक्टर म्हणजेच ७२ टक्के पेरणी झाली आहे. त्यातच जूनमध्ये सरासरीच्या १७६.२ मिलिमीटरपैकी अवघा ९०.८ मिलिमीटर म्हणजेच ५१ टक्के पाऊस पडला.
जुलैमध्ये सरासरीच्या ३०९.३ मिलिमीटरपैकी २८१.६ मिलिमीटर म्हणजेच ९१ टक्के पाऊस पडला. मात्र जो काही दोन महिन्यांत पाऊस पडला तो प्रामुख्याने पश्चिम पट्ट्यात पडला असला, तरी पूर्व भागात पावसाचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. त्यामुळे या भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा लागून आहे.
तुरळक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी काही ठिकाणी पेरणी केली आहे. त्यासाठी आर्थिक परिस्थिती नसताना उसनवारीने आणि कर्ज काढून दोन महिन्यांपासून तयारी केली आहे. परंतु ऐन पावसाळ्यात पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे खरीप हंगामात पुरेशा प्रमाणात पेरणी न झाल्याने खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी चांगलेच चिंतेत सापडले आहेत.
एक जून ते ४ ऑगस्ट या कालावधीत हवेली तालुक्यात अवघा २५ टक्के पाऊस पडला आहे. तर शिरूरमध्ये २७ टक्के, बारामतीमध्ये १८ टक्के, इंदापूर २७ टक्के, दौंडमध्ये २९ टक्के, पुरंदरमध्ये २३ टक्के पाऊस पडला आहे.
हा अत्यंत कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे पेरणीच्या क्षेत्रात फारशी वाढ झालेली नाही. सध्या हवेली तालुक्यात दोन हजार ५९७ हेक्टर, शिरूर तालुक्यात १६ हजार ५२९ हेक्टर, बारामती चार हजार २४६ हेक्टर, इंदापूर सहा हजार २४६, दौंडमध्ये ३ हजार २२३, पुरंदरमध्ये दहा हजार १७५ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
सर्वांत कमी पेरणी बारामती तालुक्यात झाली आहे. बारामतीच्या पश्चिम भागात व पूर्व भागात अजूनही पाऊस नसल्याने पिके सुकत आहेत. हीच परिस्थिती इंदापूर, शिरूर, पुरंदर, दौंड भागांत आहे. त्यामुळे या भागात खरीप हंगाम अक्षरशः वाया गेल्याची स्थिती आहे. ज्या ठिकाणी पाणी आहे, तेथे शेतकऱ्यांनी जनावरांसाठी चारा पिकांचे नियोजन केले आहे.
पीकविमा योजनेत विक्रमी अर्ज
एक रुपयात पीकविमा या पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत पूर्वेकडील तालुक्यात मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. कृषी विभागाने तत्परता दाखवत गावस्तरीय कार्यशाळाचे आयोजन करून पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.