
Nashik News : गत सप्ताहात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीने जिल्ह्यातील २३ हजार हेक्टरवरील पिके नेस्तनाबूत झाली आहेत. पिकांची मोठी हानी झाल्याने कोट्यवधी रुपयांचे भांडवल वाया गेल्याची भीषण परिस्थिती आहे. त्यानंतर गेल्या तीन दिवसांत पावसाचे वातावरण निवळले असून, आता उन्हाचा चटका वाढत असून लाहीलाही होत आहे.
असे असतानाच ऊन-सावलीचा खेळ सुरू असताना शुक्रवार(ता.१४) रोजी वादळी वाऱ्यासह पावसाने नांदगाव,सिन्नर व येवला तालुक्यात दणका दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची धावपळ उडाल्याचे दिसून आले.
नांदगाव तालुक्यात शहर परिसरासह तालुक्यातील लक्ष्मीनगर भागात पावसाने झोडपून काढले, तर बाणगाव, भालूर परिसरात तुरळक सरी झाल्या.
एकीकडे पिके काढण्याची लगबग सुरू असतानाच सायंकाळच्या सुमारास झालेल्या या पावसाने शेतातील पिके झाकण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ दिसून आली, तर लक्ष्मीनगर गावात भवानी मातेचे यात्रोत्सव असल्याने अचानकपणे आलेल्या पावसाने नागरिकांची व व्यवसायिकांची तारांबळ झाली.
शेतकऱ्यांनी कांदे झाकून ठेवले होते मात्र ताडपत्री उडून गेल्याने या भागातील शेतकऱ्यांचे कांदे पावसात भिजले आहे. कांद्यासह कांद्याचे डोंगळे, उन्हाळी मका, टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाले.
मागील. रविवारी रविवारी(ता.९) तालुक्यातील घाटमाथ्यावर जातेगाव,बोलठाण भागात पाऊस व गारपिटीने कांदा व भाजीपाला शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने मोठा फटका बसला आहे. हे संकट असताना काही दिवसात पुन्हा अस्मानीच्या संकटाने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पावसाने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावात पावसाने हजेरी लावली. रामपूर,वावी, पांगरी, पाथरे, शहा, पंचाळे, मीठसागरे परिसरातही सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला.
येवला तालुक्यातील उत्तर भागात नायगव्हाण,कुसूर,कुसमाडी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या. येथेही चारा पिके,कांदा डेंगळे आडवी झाल्याने मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे.
वीज कोसळून महिलेचा मृत्यू
तालुक्याच्या पूर्व भागात सायंकाळी विजांच्या कडकटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली.पाऊस आल्याने रामपूर (पुतळेवाडी) येथील वैशाली कवडे (वय ३५) या घराच्या अंगणातील लिंबाच्या झाडाजवळ वाळत टाकलेले कपडे काढण्यासाठी गेल्या होत्या.मात्र,त्याचवेळी झाडावर वीज कोसळल्याने वैशाली यांनाही विजेचा जोरदार झटका बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. नातेवाइकांनी त्यांना तत्काळ सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.