Crop Damage : राज्यात पीक नुकसान वाढले !

पावसापुढे शेतकरी हतबल; २० ते ५० टक्क्यांपर्यंत फटका
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

पुणे : राज्यात ऐन सुगीच्या मोसमात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने खरीप शेतीपिकांचे (Kharip Crop) नुकसान वाढले आहे. भाजीपाला, फळभाज्या आणि फळबागाही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्या आहेत. काढणीचा कापूस ओला होत आहे, सोयाबीन, बाजरीच्या कणसांना मोड फुटले आहेत, तर जोरदार वाऱ्याने भात पीक (Paddy Crop Damage) पडून नुकसान होत आहे. भाजीपाल्यासह फळबागांमध्ये रोग-किडींचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कृषी विभागाच्या (Agriculture Department) माहितीनुसार हे नुकसान २० टक्क्यांवर असले, तरी शेतकऱ्यांनुसार हे ५० टक्क्यांवर गेले आहे.

Crop Damage
Kharip Crop : परभणातील १०८ गावांत हंगामी पैसेवारी ५० पेक्षा कमी

राज्यात मॉन्सूनच्या चार महिन्यांचा हंगाम उलटून आता दोन आठवडे होत आले आहेत, मात्र पावसाने थांबायचे नाव घेतलेले नाही. परतीचा मॉन्सून अजूनही तळ ठोकून असल्याने शेतकऱ्यांची धास्ती वाढली आहे. राज्यात यंदा सुमारे १ कोटी ४१ लाख हेक्टरवर खरीप पेरणी झाली होती, त्यातील कृषी विभागाकडील ताज्या माहितीनुसार सुमारे २९ लाख हेक्टर क्षेत्रावर पीक नुकसान झाले आहे.

पाच टक्केपण काढणी नाही...

परभणी-हिंगोली जिल्ह्यात आठवडाभरातील पावसामुळे काढणीस आलेले कपाशी, सोयाबीन, तूर पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. दोनही जिल्ह्यांत मिळून सुमारे सव्वा पाच लाख हेक्टरवर सोयाबीन आहे, यातील पाच टक्के क्षेत्रावरील देखील काढणी झाली नाही. पावसासह असलेल्या वादळी वाऱ्यांनी कपाशीचे पीक आडवे होत आहे. बोंडे लगडलेल्या फांद्या मोडल्या आहेत. फुटलेल्या बोंडातील कापूस भिजल्याने नुकसान वाढले आहे. तुरीचे पीक जळून गेले आहे. भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Crop Damage
Crop Management : सूर्यप्रकाश ठरवतो वनस्पतींची वाढ आणि विकास

कोल्हापुरात मळणी ठप्प

दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पावसामुळे भात, भुईमूग, सोयाबीनची काढणी खोळंबली आहे. सततच्या पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आला. दसरा सणानंतर भात कापणी, भुईमूग, सोयाबीन काढणीस सुरुवात होते. जिल्ह्यात भाताची एक लाखाहून अधिक तर क्षेत्रावर तो सोयाबीनची ५० हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पावसाने शेतकऱ्यांचे नियोजन फिस्कटले आहे.

Crop Damage
Tur Crop Management : तुर पिकाच्या चांगल्या वाढीसाठी कोणते उपाय कराल?| Agrowon | ॲग्रोवन

कांदा रोपवाटिका प्रभावित

येवला, सटाणा, मालेगांव, चांदवड, देवळा, निफाड, सिन्नर तालुक्यांत पावसाचा जोर वाढला आहे. प्रामुख्याने खरीप हंगामातील सोयाबिन, मका, बाजरी ही पिके पावसात भिजल्याने मोठा फटका बसला आहे. लेट खरीप कांदा लागवडीचे नियोजन असताना रोपवाटिका खराब झाल्या आहेत. सटाणा तालुक्यात करंजाडी खोऱ्यात जोरदार पावसाने मिरची लागवड, कोथिंबीर वाहून गेली. द्राक्ष छाटणीची कामे अडचणीत सापडल्याची स्थिती आहे. शेतात सातत्याने पाणी साचून राहिल्याने भाजीपाला, टोमॅटो, मिरची, कोबी या पिकांना करपा व बुरशीजन्य रोगांचा विळखा वाढला आहे. पूर्व भागात मालेगाव, नांदगाव तालुक्यात कापूस संततधार पावसात भिजून खराब होत आहे.

तळकोकणात भात संकटात...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाने ६५ टक्के भातपीक कापणीअभावी संकटात सापडले आहे. यंदा ५५ हजार हेक्टरवर भातपीक लागवड आहे. तीन टप्प्यांत भातरोपवाटिका आणि रोपांची पुनर्लागवड होते. सध्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील संपूर्ण आणि तिसऱ्या टप्प्यात लागवड केलेली ५० टक्के असे ६५ टक्के भातपीक पूर्णतः परिपक्व झाले आहे.या पिकांची कापणी पावसामुळे रखडली आहे.

वऱ्हाडात कपाशीतून अंकुर...

दसऱ्यापासून पावसाची दररोज हजेरी आहे. वऱ्हाडात खरिपातील २५ टक्केही सोयाबीनची काढणी झालेली नाही. शेतकऱ्यांचे सुमारे ७५

टक्के सोयाबीन शेतात आहे. कुठे सोंगणी करून ढीग लावलेला, तर कुठे तसेच पडून आहे. सततच्या पावसाने या सोयाबीनमधून कोंब बाहेर आले आहेत. कापूस झाडावरच भिजत आहे, परिपक्व बोंड सततच्या पावसाने काळवंडत आहेत. काही ठिकाणी उमललेल्या बोंडामधून थेट अंकुर आले आहेत.

सोयाबीनला मोड...

सांगली, सातारा जिल्ह्यांत परतीच्या पावसचा जोर वाढत आहे. सातारा जिल्ह्यात सप्टेंबर झालेल्या पावसामुळे २९४३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. परतीच्या दमदार पावसाने शेतातून पाणी निघत नसल्याने पिके कुजू लागली आहे. दोन्ही जिल्ह्यांत भिजणाऱ्या सोयाबीनला मोड फूटू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

खरीप २०२२

एकूण क्षेत्र : १ कोटी ४१ लाख हेक्टर

सध्याचे नुकसान क्षेत्र : २९ लाख हेक्टर

नुकसानीतील पिके

- कपाशी, सोयाबीन, भात, मका, तूर, बाजरी, ज्वारी, भाजीपाला, फळभाज्या, फळबागा

पैसेवारीबाबत शंका...

अनेक जिल्ह्यांच्या पैसेवारी जाहीर होत आहे. यात ५१ ते ५५ टक्क्यांच्या दरम्यान पैसेवारीत बहुतांश गावे ५० टक्क्यांवर येत असल्याने शंका उपस्थित केल्या जात आहेत. यामुळे नुकसान कमी दाखविले जात असल्याच्या तक्रारी शेतकरी, शेतकरी नेत्यांनी केल्या आहेत.

माझे २५ एकरांपैकी १७ एकरांवरील सोयाबीनची कापणी केली. शेतात पसर पडलेली आहे. सततच्या पावसामुळे भिजून सोयाबीनचे नुकसान झाले आहे. काही प्रमाणात मोड येत आहेत. पाऊस सुरू राहिला तर सर्वच सोयाबीनला मोड फुटू शकतात. पीकविमा भरपाईसह आर्थिक मदत द्यावी.

- शंकर गुट्टे, बेलुरा, जि. हिंगोली

मागील आठवड्यापासून पावसात खंड नाही. मेथी तसेच अन्य भाजीपाल्याचे खूप नुकसान झाले आहे. काल वाऱ्यासह झालेल्या पावसाने कापसाची झाडे वाकली आहेत.

- पंडित थोरात, खानापूर, जि. परभणी

अवकाळी पावसामुळे भात कापणी, भुईमूग काढणी खोळंबली आहे. काही ठिकाणी भात अर्ध्यावरच शेतात पडले आहे. कापलेल्या पिंजरात पाणी तुंबल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न उद्‍भवणार आहे.

- शहाजी भोसले,

कोनवडे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर

माझे एकरवर भातपीक असून पीक कापणीला आले आहे. परंतु परतीच्या पावसामुळे कापणी करता येत नाही. जर पुढील आठ दिवसांत कापणी करता आली नाही तर संपूर्ण पीकच संकटात सापडणार आहे.

- मंगेश सुद, भात उत्पादक शेतकरी, खांबाळे, जि. सिंधुदुर्ग

पाऊस व वाऱ्यामुळे कपाशीचे पाच एकरांतील पीक जमीनदोस्त झाले. लवकरच वेचणी सुरू होणार होती. आतापर्यंत एक लाखापर्यंत खर्च झालेला आहे. बोंडसळ होऊ लागली आहे. उत्पादन घटणार हे निश्‍चित आहे. तहसीलदारांना नुकसान पाहणीसाठी निवेदन दिले आहे.

- शिवाजी जाधव, डावरगाव, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा

दीड एकर सोयाबीन शेतात उभे आहे. या पावसामुळे पिकाचे नुकसान होईल अशी भीती आहे.

- तात्यासो नागावे, खटाव, ता. पलूस, जि. सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com