
Beed News : खरीप हंगामाच्या सुरुवातीला जून महिन्यात पाऊस पडला नाही परिणामी जुलै महिन्यात झालेल्या अत्यल्प पावसावर खरीप पेरणी झाली. पण मोठा पाऊस आलाच नाही. त्यामुळे जुलै, ऑगस्ट, अर्धा सप्टेंबर संपला तरीही पावसाची प्रतीक्षाच असल्याने पिकांची दुरवस्था झाली. तर शासन मात्र त्यांच्या कार्यक्रमातच मशगूल आहे. तालुक्यात पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१७ असून यावर्षी पावसाळ्याचे साडेतीन महिने संपले तरी आतापर्यंत फक्त ५३ टक्केच पाऊस झाला आहे. मागील चार वर्षांपासून सतत धरण भरत असल्याने हिवाळी, उन्हाळी हंगामात पाणी मिळाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हिवाळी, उन्हाळी हंगामातही पाणी मिळेल या आशेवर ऊस लागवड केली होती.
परंतु सध्या धरणात साडेअकरा टक्केच पाणी असल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरी, विंधन विहिरींचे पाणी उपलब्ध असलेल्या बहुतांशी शेतकऱ्यांनी खरीप पेरणी जून महिन्यातच केली होती. तर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसावर कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या होत्या.
परंतु ऑगस्ट, सप्टेंबर महिना अर्धा संपला तरी पिकांची व जमिनीची तहान भागेल असा मोठा पाऊस न झाल्याने पिके सुकली असून सोयाबीनला लगडलेल्या शेंगा, कपाशीची पाते, पाने, फुले गळून पडत आहेत.
कपाशीवर लाल्या, करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, परंतु थोडाथोडा पडत असलेला पाऊस, महागडी खते, औषधी फवारणी व मशागत करून शेतकरी पिके जोपासत आहेत. अशा परिस्थिती शासन मात्र कार्यक्रमात गुंतले आहे. तालुका परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी हताश झाला आहे.
बागायतदार शेतकरीही धास्तावला
जून महिन्यामध्ये उपलब्ध पाण्यावर बागायतदार शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली परंतु पावसाळ्याचे तीन महिने कोरडेच गेल्याने विहीर, विंधन विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. यामुळे बागायतदार शेतकरी देखील धास्तावला आहे.
उत्पन्नात पन्नास टक्के होणार घट
पावसाअभावी सोयाबीनची पाने गळाली असून शेंगांतील दाणे अर्धवट भरत आहेत. तर कपाशीला लगडलेली पाते, बोंडे, फुलांची गळती होत आहे. कपाशीवर करप्या, लाल्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे सोयाबीन, कपाशीच्या उत्पन्नात ५० टक्क्यांची घट होणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.