
नाशिक : जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाचा जोर (Rain Intensity) कायम असून पिके भुईसपाट (Crop Damage) झाली आहेत. शिवारात पाणी साचल्याने पिके तरंगत असल्याची गंभीर स्थिती आहे. असे असताना शुक्रवारी (ता. २१) दुपारनंतर सटाणा, सिन्नर, इगतपुरी, नाशिक, पेठ, सुरगाणा तालुक्यांतील अनेक भागांत पावसाचा जोर दिसून आला. सटाणा तालुक्यातील मोसम व करंजाड खोऱ्यात जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. या भागात फटका खरीप पिकांसह कांदा रोपे, (Onion Seedling) भाजीपाला या पिकांना बसला आहे. त्यामुळे उरल्या सुरल्या पिकांची नासाडी सुरूच आहे.
सटाणा तालुक्यातील मोसम खोऱ्यातील ताहराबाद, अंतापूर, सोमपूर, तांदुळवाडी, नांदीन, दसवेल, पिंपळकोठे तर करंजाड खोऱ्यातील करंजाड, पिंगळवाडे, मुंगसे, निताणे, पारनेर, भुयाणे, जाखोड या भागात पावसाने भाजीपाला, कांदा रोपे यासह काही प्रमाणात काढणीस आलेल्या पूर्व हंगामी द्राक्ष पिकाचे नुकसान वाढवले आहे.
नाशिक तालुक्यांच्या पश्चिम भागात गिरणारे परिसरात पावसाचा जोर दिसून आला. सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे, सिन्नर, डूबेरे, पांढूर्ली, देवपूर या महसूल मंडळात पावसाने भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर बाधित झाली आहेत. पेठ तालुक्यातील कोहोर, सुरगाणा तालुक्यातील सुरगाणा, उंबरठाणा व इगतपुरी तालुक्यांतील वाडीवऱ्हे, टाकेद या महसूल मंडळात पावसाचा जोर कायम राहिल्याने भात, नागली, वरई पिकांचे नुकसान वाढले आहे. भात पिके आडवी झाल्याने व शेतात पाणी असल्याने शेतकऱ्यांची भात सोंगणी थांबली आहे.
निफाड तालुक्यातील चांदोरी परिसरात हलका पाऊस झाला. नांदगाव तालुक्यातील जातेगाव परिसरात हलका मध्यम पाऊस झाला. कळवण, येवला, चांदवड, दिंडोरी, देवळा तालुक्यात पावसाचा जोर ओसरल्याने शेतकऱ्यांची सोयाबीन, मका सोंगणी सुरू झाली आहे. तर काही ठिकाणी शेतात भिजलेली बाहेर आणण्याच्या कामांची लगबग सुरू आहे. चांदवड तालुक्यात दोन दिवसांपासून पाऊस थांबला आहे; मात्र कांदा पिकात अति पावसामुळे पाणी साचून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
उन्हाळ कांदा रोपवाटिकांना मोठा फटका
कसमादे भागात सटाणा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाने उन्हाळा कांदा रोपवाटिकांचे मोठे प्रमाण नुकसान केले आहे. अनेक ठिकाणी उगवून आलेली रोपे वाहून गेले तर मर होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. याअगोदर शेतकऱ्यांनी दुबार रोपवाटिका तयार केल्या; मात्र यातही रोपांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा तिसऱ्यांदा रुपये टाकण्याची वेळ येणार असल्याची भीषण परिस्थिती आहे.
सहा धरणांतून विसर्ग सुरू
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम असल्याने दारणा , कडवा,वालदेवी,गंगापूर,आळंदी या धरणांतून विसर्ग सुरू आहे. ते भोजापुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जिर अधिक असल्याने २१३० क्युसेक विसर्ग सुरू आहे. रात्री गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्याने विसर्ग वाढविण्यात आला होता. त्यामुळे नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील रामकुंड परिसरात पाणी वाढले होते. नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून ११,१९२ क्युसेक विसर्ग गोदावरी नदी पात्रात सोडण्यात येत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.