Sugar Season 2023 : यंदाच्या साखर हंगामावर दुष्काळाचे सावट

Sugarcane Crushing Season : गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही जून व जुलैमध्ये पावसाने ओढ दिल्याने आगामी २०२३-२४ च्या ऊस गाळप हंगामावर दुष्काळाची भीती आहे.
Sugar
SugarAgrowon

Pune News : गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही जून व जुलैमध्ये पावसाने ओढ दिल्याने आगामी २०२३-२४ च्या ऊस गाळप हंगामावर दुष्काळाची भीती आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये पाणीसाठा बऱ्यापैकी कमी असून, त्याचा परिणाम ऊस उत्पादनावर व साखर कारखानदारीवर होण्याची शक्यता आहे.

याकडे बारकाईने लक्ष असून, पुढील हंगामाकरिता संबंधित शिखर संस्थांकडून कारखानदारीची मते जाणून घेतल्यानंतर शासन स्तरावर योग्य ते निर्णय घेतले जातील. तसेच साखरेच्या एमएसपीमध्ये ३ हजार ७२० रुपये वाढ करावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याची माहिती सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या वतीने शनिवारी (ता.१२) वसंतदादा साखर संस्थेत (व्हीएसआय) आयोजित तांत्रिक चर्चासत्रात मंत्री पाटील बोलत होते.

Sugar
Sugar Rate : बाजारात साखरेचे दर स्‍थिर

या वेळी व्यासपीठावर साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, ‘व्हीएसआय’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले, ‘‘यंदाच्या ऊस हंगामाची स्थिती बिकट होण्याची चिन्हे आहेत. कारण मागील साखर हंगामात तुलनेने २६६ लाख टनांनी गाळप कमी होऊन साखरेचे उत्पादन ३२ लाख टनांनी कमी झालेले आहे.

तशीच परिस्थिती यंदा असून, जून-जुलैमध्ये पाऊस झालेला नाही. धरणासाठा देखील कमी असून, पाण्याच्या आवर्तनाचे देखील नियोजन करावे लागणार आहे. त्यादृष्टीने सरकार काम करीत असून, साखर हंगामाबाबत नैसर्गिक घडामोडींवर सरकार लक्ष ठेवून आहे. तसेच उसाची एफआरपी सध्या ३ हजार ५००च्या दरम्यान आहे. ती ३ हजार ७२० करण्याचा प्रस्ताव शिखर संस्थांशी बोलून केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे.’’

Sugar
Sugar Mills : साखर विक्रीची माहिती न देणाऱ्या कारखान्यांविरोधात कारवाईचा बडगा

‘गाळपात माती, कचरा नको याची दक्षता घ्या’

ऊसतोडणी यंत्राच्या माध्यमातून ऊसतोडणी करीत असताना मोठ्या प्रमाणावर पालापाचोळा, माती, कचरा साखर कारखान्यापर्यंत येत आहे. त्याचा अनावश्यकपणे गाळपामध्ये समावेश होतो आहे. यात साखर कारखान्यांच्या स्तरावर अनुत्पादक साहित्याचे गाळप होऊन समस्येस सामोरे जावे लागत आहे. याबाबत साखर आयुक्तालयाच्या माध्यमातून अभ्यासगटाची स्थापना करून तोडणी यंत्राच्या माध्यमातून पाचटाचे प्रमाण निश्‍चित व्हावे.

याबाबत तोडणी यंत्रचालकांनी अधिक काळजी घेऊन ब्लोअर फॅन चालू ठेवणे. तसेच योग्य वेळी दुरुस्ती करून वेळच्या वेळी प्लेट बदलल्यास अनावश्यक कचरा, पालापाचोळा चांगल्या उसासोबत जाणे थांबू शकते. याबाबतीत कारखान्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. ब्राझीलसारख्या देशामध्ये यासाठी ड्राय क्लिनिंग सिस्टिमचा वापर केला जातो. या तंत्रज्ञानाचा कसा वापर करता येऊ शकतो याचा साखर कारखान्यांनी विचार करावा, असेही सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

बायो सीएनजीवर संतोष गोंधळेकर यांचे सादरीकरण

भविष्यात डिझेल, पेट्रोल आणि कोळशाला १०० टक्के पर्याय देण्यासाठी बायो सीएनजीबाबत संतोष गोंधळेकर यांनी सादरीकरण केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com