Chhatrapati Sambjinagar News : जिल्ह्यात मका पिकाचे सरासरी क्षेत्र १ लाख ७५ हजार २८७.२ हेक्टर इतके आहे. पैकी ८७,६४८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. दुसरीकडे कपाशीचे ३ लाख ९४ हजार ७७१ हेक्टर सरासरी क्षेत्र असून त्यापैकी आतापर्यंत १ लाख ८७ हजार ९७३ हेक्टरमध्ये लागवड झाली आहे.
आर्द्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी उत्साहाने चाड्यावर मूठ धरून पेरणीच्या कामाला लागला. मात्र यंदा पेरणीयोग्य पाऊस उशिरा पडल्याने उडीद, मुगाच्या पेरणी क्षेत्रावर व उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत जिल्ह्यात ४५.३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मृग नक्षत्रात पेरणीयोग्य पाऊस पडला नाही. मात्र आर्द्राच्या पावसाने दिलासा दिला. मुग आणि उडीद या कमी कालावधीच्या पिकाची १ जुलैनंतर पाऊस झाला तर शिफारशीनुसार लागवड करू नये. केली तर उत्पादकतेत घट येऊ शकते. त्यामुळे आधीच गटात चाललेले मूग उडदाचे क्षेत्र आणखी घटनेची चिन्ह निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात मुगाचे सरासरी क्षेत्र १३ हजार ८२५ हेक्टर असून त्यापैकी आतापर्यंत २ हजार ९५१ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. उडीद पिकाचे ५ हजार ३८४.८ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यापैकी ७१८.८ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. तुरीचे ३५ हजार ७००.२ हेक्टर क्षेत्र आहे.
त्यापैकी ११ हजार ६५५ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. डाळवर्गीय पिकांचे ५ हजार ५९५५ हेक्टर सरासरी क्षेत्र असून आतापर्यंत १५ हजार ५५६.३ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. ज्वारीचे पैठण, सिल्लोड, सोयगाव तालुक्यात १ हजार ३४३.६ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे.
आतापर्यंत पैठण, सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यात १९५ हेक्टरमध्ये ज्वारीची पेरणी झाली आहे. यापैकी पैठण तालुक्यात १५६ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. बाजरीचे जिल्ह्यात ३१ हजार ९०४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यापैकी ७ हजार ३०० हेक्टरमध्ये आतापर्यंत पेरणी झाली आहे.
सोयाबीनचेही १४ हजार ४२४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे त्यापैकी ९ हजार २०१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तृणधान्याचे २ लाख १२ हजार ०८२ हेक्टर सरासरी क्षेत्र असून त्यापैकी ९५ हजार ७२१ हेक्टरवर पेरणी झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
‘एक जुलैनंतर मुग, उडदाची लागवड करू नका’
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख म्हणाले, की १ जुलैनंतर मुग, उडीद पिकांची लागवड न करण्याची विद्यापीठाने शिफारस केली आहे. जर केली तर त्याचा उत्पादकतेवर परिणाम होतो.
जिल्ह्यात पाऊस झाला मात्र स्कॅटर्ड झाला आहे. ८२ मंडळांपैकी ५० मंडळांमध्ये १०० मीलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे तर उर्वरित ३२ मंडळांमध्येही ५० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे बऱ्याचशा पेरण्या झालेल्या आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.