Nashik Agriculture News : २०२२-२३ या गत आर्थिक वर्षात महावितरणने (Mahavitaran) १ लाख ७० हजार २६३ कृषिपंपांना वीजजोडणी (Agriculture Pump Electricity) देऊन गेल्या वर्षांतील उच्चांक स्थापित केला आहे. कृषिपंपांना दहा वर्षांतील सर्वाधिक वीज संयोजन देण्यासोबतच प्रलंबित संयोजनाची संख्यादेखील आतापर्यंतची सर्वांत कमी झाल्याने महावितरणला दुहेरी यश मिळाले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी ऊर्जा खात्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर महावितरणला शेतकऱ्यांच्या वीज संयोजनाचा पेंडिंगचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्याची सूचना केली होती. शेतकऱ्यांनी वीज संयोजनासाठी पैसे भरल्यानंतर कृषिपंपासाठी प्रत्यक्ष संयोजन मिळण्यास विलंब होतो. त्याला पेड पेंडिंग म्हणतात.
ऊर्जामंत्र्यांच्या आदेशानुसार कृषिपंपांना प्राधान्याने वीज संयोजन देण्यासाठी महावितरणने योजना आखली. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत गेल्या दहा वर्षांमध्ये एका आर्थिक वर्षातील कृषिपंपांची सर्वाधिक वीज संयोजन देण्यात यश मिळविले.
महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीमुळे कृषिपंपांच्या प्रलंबित वीज संयोजनाची संख्यादेखील कमी होऊन ती गेल्या वित्तीय वर्षात १ लाख ६ हजार ३४० इतकी झाली आहे. ही आतापर्यंतची एका आर्थिक वर्षातील सर्वांत कमी संख्या आहे.
याआधी २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या अखेरीस प्रलंबित संयोजनाची संख्या १ लाख ६७ हजार ३८३ होती, तर २०२०-२१ मध्ये एक लाख ८४ हजार ६१३ आणि २०२१-२२ मध्ये एक लाख ८० हजार १०४ होती.
महावितरणने एकूण १ लाख ७० हजार संयोजनपैकी १ लाख ५९ हजार संयोजन ही पारंपरिक पद्धतीने दिली आहेत. सौरपंप किंवा उच्चदाब वितरण प्रणाली या विशेष योजनांतील केवळ ११ हजार संयोजन आहेत. याआधीच्या वर्षात दिलेल्या १ लाख ४५ हजार ८६७ कृषिपंप संयोजनपैकी ४६ हजार १७५ संयोजन ही सौर किंवा उच्चदाब वितरण प्रणालीतील होती.
२०२२-२३ मध्ये सौर आणि उच्चदाब वितरण प्रणाली योजनांचा फारसा आधार नसताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने दिलेल्या संयोजनाची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे.
गावाबाहेर शेतामध्ये दूर दूर असलेल्या विहिरींसाठी कृषिपंप संयोजन देताना अनेक अडचणी येतात. कृषिपंपाना वीज संयोजन देण्यासाठी विजेचे खांब, वाहिन्या इत्यादी सुविधा आधी निर्माण कराव्या लागतात.
पावसाळ्यात, तसेच शेतात पिके उभी असताना विजेचे खांब उभारणे, वाहिन्या जोडणे, ट्रान्स्फॉर्मर बसविणे ही कामे करता येत नाहीत.
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूर, सततचा पाऊस अशा नैसर्गिक संकटांमुळे शेतांमध्ये वीज संयोजनच्या पायाभूत सुविधा उभारण्यात अनेक अडथळे आले. तरीही महावितरणने दहा वर्षांतील सर्वाधिक वीज संयोजन देणे आणि प्रतीक्षायादीतील संख्या कमी करून हे यश मिळविले आहे.
ऊर्जामंत्र्यांनी पेड पेंडिंगचा प्रश्न सोडविण्याची सूचना दिल्यानंतर महावितरणने हे काम आव्हान म्हणून स्वीकारले. कृषिपंपांना संयोजन देण्यासाठी कामाचा पाठपुरावा करण्यासाठी संपूर्ण राज्यपातळीवर दर पंधरा दिवसांनी आढावा घेण्यात आला.
कृषिपंपांना संयोजन हा महावितरणसाठी अत्यंत प्राधान्याचा विषय झाला व त्याचा सातत्याने पाठपुरावा चालू होता.
शेतकऱ्यांना संयोजन देण्यासाठी राज्य शासनाने ८०० कोटी रुपयांचा निधी दिला, तर महावितरणने स्वतः २४१ कोटी रुपये निधी खर्च केला. याखेरीज शेतकऱ्यांच्या वीजबिल वसुलीतून मिळालेला पैसाही कृषिपंपांना संयोजन देण्यासाठी वापरण्यात आला.
- विजय सिंघल, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महावितरण.
गेल्या तीन वर्षांतील स्थिती :
वर्ष...कृषिपंप वीजसंयोजन
२०१९-२०...९६,३२७
२०२०-२१...१,१७,३०४
२०२१-२२...१,४५,८६७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.