
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने (Heavy Rain) अनेक ठिकाणी थैमान घातले आहे. दोघांचे सरकार असून उपमुख्यमंत्री बिनखात्याचे मंत्री आहेत. सरकार अस्तित्वात नसल्याने प्रशासन ठप्प आहे, त्यामुळे पावसामुळे झालेल्या नुकसानीचा (Crop Damage) आढावा घेण्यासाठी आणि त्याची भरपाई (Compensation) मिळविण्यासाठी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली पथके पाहणी करणार असून, त्यांच्या अहवालाच्या आधारे सरकारकडे पाठपुरावा करू, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली.
पटोले म्हणाले, रब्बीच्या धान, हरभऱ्याची खरेदी झाली नाही जी खरेदी झाली त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. शेतकरी हंबरडा फोडत आहे. त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही. राज्यातील ही परिस्थिती पाहता काँग्रेस नेत्यांचे पथक अतिवृष्टिग्रस्त भागातील विविध जिल्ह्यांना भेटी देऊन पाहणी करतील व त्यानंतर नुकसानग्रस्तांना भरीव मदत मिळावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करू. नुकसानग्रस्त भागातील जनतेला तातडीची मदत द्यावी यासाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत द्यावी व पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिरायती प्रति हेक्टरी ५० हजार रुपये व बागायती शेतकऱ्यांना १ लाख रुपये तत्काळ प्राथमिक मदत देण्याची मागणी केली होती. परंतु झालेले नुकसान प्रचंड मोठे असून, अजून पंचनामेही झालेले नाहीत, त्यामुळे काँग्रेसच्या पाहणी दौऱ्यातील नुकसानीचा आढावा अहवालानुसार जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा केला जाईल.
सर्व प्रमुख नेते करणार दौरे
राज्यातील अतिवृष्टिग्रस्त भागाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नेते भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. यामध्ये विधिमंडळ पक्षनेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे अहमदनगर व नाशिक जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण परभणी व नांदेड, पृथ्वीराज चव्हाण सातारा जिल्हा, के. सी. पाडवी जळगाव व नंदूरबार जिल्हा, अमित देशमुख औरंगाबाद व लातूर जिल्हा, सुनील केदार नागपूर व वर्धा जिल्हा, डॉ. नितीन राऊत गोंदिया व भंडारा जिल्हा, विजय वडेट्टीवार गडचिरोली व सिंधुदुर्ग जिल्हा, यशोमती ठाकूर अमरावती व अकोला, अस्लम शेख पालघर जिल्हा, वर्षा गायकवाड रायगड जिल्हा, माजी राज्यमंत्री सतेज पाटील कोल्हापूर, डॉ. विश्वजित कदम सांगली जिल्हा, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान ठाणे जिल्हा, बसवराज पाटील बीड व उस्मानाबाद, आमदार कुणाल पाटील धुळे जिल्हा, आमदार प्रणिती शिंदे सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. प्रत्येक माजी मंत्री, प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार, खासदार यांच्याबरोबर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे एक पथकही असेल असे पटोले म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.