
शिमला (वृत्तसंस्था) ः हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये शनिवारी (ता. २०) अक्षरशः आभाळ फाटले. (Himachal Cloudburst) विविध ठिकाणांवर अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) अचानक आलेला पूर आणि ढगफुटीमुळे मोठी जिवीत व वित्तहानी (Heavy Rain Damage) झाली. हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणांवर भूस्खलन (Land Slide) झाल्याने सहा जणांचा मृत्यू झाला तर अन्य तेरा जण वाहून गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हमीरपूर जिल्ह्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकून पडलेल्या बावीस नागरिकांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली आहे.
उत्तराखंडमध्ये डेहराडूनच्याजवळ मालदेवता, सरखेत, टिहरी आणि यमकेश्वर या भागांत ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले असून हिमाचल प्रदेशात मंडी आणि चंबा जिल्ह्याला ढगफुटीचा जबर तडाखा बसला. काही माध्यमांनी हिमाचलमध्ये तेरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली असून शंभर कोटी रुपयांपेक्षाही अधिकच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे बोलले जाते. कांगडा जिल्ह्यातील चक्की पूल कोसळल्याने जोगिंदरनगर-पठाणकोट दरम्यानची रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाने हा पूल असुरक्षित असल्याचे जाहीर केले होते. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी मृतांबाबत शोक व्यक्त करतानाच सुरक्षा आणि प्रशासकीय यंत्रणा बाधित जिल्ह्यांमध्ये युद्धपातळीवर बचाव मोहीम राबवीत असल्याचे सांगितले. चंबा जिल्ह्यामध्ये भूस्खलनामुळे एक घर कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला. मंडी जिल्ह्यामध्ये अचानक आलेल्या पुरामध्ये एक मुलगी मृत्युमुखी पडली तर अन्य तेराजण वाहून गेल्याची भीती व्यक्त होते आहे. याच मुलीच्या कुटुंबातील पाच जणांचा वाहून गेलेल्यांमध्ये समावेश असल्याचे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
हॉटेलांत पुराचे पाणी
उत्तराखंडमध्ये डेहराडून जिल्ह्याच्या जवळ मालदेवता येथे ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणांवर हॉटेलांत पुराचे पाणी घुसले होते. रायपूर आणि लगतच्या भागाला जोडणारा पूल वाहून गेला आहे. शेकडो गावांचा राजधानीशी असलेला संपर्कही तुटलेला आहे. टपकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पुराचे पाणी शिरले होते. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करत मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला.
आठ जण गाडले गेल्याची भीती
या ढगफुटीनंतर हिमाचलमध्ये बाघी ते जुना कटोला भागातील नागरिकांनी घरे सोडत सुरक्षितस्थळी स्थलांतर केले. गोव्हार ब्लॉकमधील कासहान खेड्यात भूस्खलन झाल्याने कोसळलेल्या घराखाली आठ जण गाडले गेल्याची भीती व्यक्त होते आहे. अद्याप त्यांचे मृतदेह हाती लागलेले नाही. या पावसामुळे मंडी जिल्ह्यातील रस्त्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पावसाचा धोका कायम
हिमाचल प्रदेश आपत्ती व्यवस्थापन विभागाने येत्या २५ ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने अनेक ठिकाणांवर भूस्खलनाचा धोका बळावला आहे. पुढील चोवीस तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना धोका
कांगडा, चंबा, मंडी, कुलू, शिमला, सिरमौर, सोलन, हमीरपूर, उना आणि विलासपूर
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.