
Himachal Pradesh Rain Update : गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हैराण झालेल्या हिमाचल प्रदेशला सोमवारी (ता. १७) पुन्हा ढगफुटीचा फटका बसला. कुल्लू जिल्ह्यात सोमवारी पुन्हा पावसाने हाहाकार माजवला.
कुल्लूच्या सेऊबाग आणि काईस येथे मुसळधार पावसामुळे महापूर आला असून एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. रविवारी (ता. १६) रात्री काईस आणि सेऊबाग येथे पाण्याबरोबर मातीही वाहून आली आणि तसेच अनेक गाड्यांचे नुकसानही झाले.
सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास मनाली विधानसभा क्षेत्रातील काईस आणि सेऊबाग येथे महापूर आला. रात्री गल्ल्यांतील नाल्यात माती आणि पाणी आल्याने नागरिकांनी घर सोडले. यात तीन जणांना रुग्णवाहिकेतून दवाखान्यात नेण्यात आले.
काही घरांची हानीदेखील झाली. खराहल खोऱ्यात न्यूली जवाणी नाला येथे पूर आल्याने अनेक घरांची आणि दुकानांची हानी झाली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे दिसत आहेत.
या वेळी झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून ९ गाड्यांचे नुकसान झाले. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रायसन आणि काईस येथे ढगफुटी झाली असून चन्सारी गावातील बादल शर्मा नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
तसेच खेमचंद (रा. बडोगी), सुरेश शर्मा (रा. चन्सारी) आणि कपिल (रा. चन्सारी) हे जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहेत. राष्ट्रीय महामार्गावर माती आल्याने वाहतूक विस्कळित झाली आहे.
घटनास्थळी जेसीबी पाठविण्यात आले असून ढिगारे बाजूला करण्याचे काम सुरू आहे. रविवारी कुल्लू जिल्ह्यातील लगघाटीच्या मानगडसह चार गावांत पावसाने धुमशान घातले. सरवरी खड्डची पाणी पातळी वाढल्याने अनेक दुकाने आणि बस तळ रिकामे करावे लागले.
आतापर्यंत २६ मृतदेह सापडले
महापूर आणि भूस्खलनामुळे कुल्लू जिल्ह्यात आतापर्यंत २६ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. यामध्ये श्रीखंड महादेव यात्रेत सहभागी झालेल्या ८ भाविकांचा समावेश आहे. तसेच मनालीहून कुल्लूपर्यंतच्या बियास नदीत काही मृतदेह आढळून आले आहेत. यापैकी काही मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
उर्वरित मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आले आहेत. मात्र २४ जूनपासून पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये ११८ जणांचा मृत्यू झाला. तसेच ४४१५ कोटी रुपयांचे नुकसान झाले.
आसाममध्ये ब्रह्मपुत्रच्या पातळीत वाढ
विश्वनाथ : देशभरात विशेषत: उत्तरेत मुसळधार पाऊस पडत असून सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. यादरम्यान आसाममध्ये पुरामुळे अनेक भागातील वाहतूक ठप्प पडली आहे. ब्रह्मपुत्र नदीची पातळी वाढल्याने धुब्री, तेजपूर तसेच बेकीत स्थिती बिघडली आहे. चिरांग आणि बोंगाईगॉंव जिल्ह्यात पूर आला आहे.
भूतानने कुरिचू धरणातून पाणी सोडल्याने आसामच्या सखल भागाला ॲलर्ट दिला आहे. आसाममधील १७ जिल्ह्यांना पुराचा धोका निर्माण झाला असून त्याचा फटका ६७ हजार नागरिकांना फटका बसला आहे. विश्वनाथ उपविभागात असलेले ४७ गावे जलमय झाली आहे तर ८५८ हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली आहे.
दिल्लीत शाळांना मंगळवारपर्यंत सुटी
नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीतील पुरामुळे शाळा करण्याबाबत दिल्ली सरकार संभ्रमात असताना १७ आणि १८ जुलै रोजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. सरकारी, सरकारमान्य आणि खासगी शाळांना हा निर्णय लालगू केला आहे.
यानुसार दिल्लीतील पूर्व, उत्तर पूर्व, उत्तर पश्चिम, उत्तर भाग, मध्य आणि दक्षिण पूर्व दिल्लीतील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. दिल्लीतील अनेक भागांत पाणी असून त्याची पातळी कमी करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. अनेक दिवसांपासून पाणी साचलेले असून यमुना नदीच्या किनाऱ्यावरील शाळांचे मदत छावण्यात रूपांतर केले जात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.