
Amravati News : मासोद येथे सिट्रस इस्टेट निर्माण होणार असून, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रकल्प वरदान ठरेल. संत्रा फळबागांचे आधुनिकीकरण यातून साध्य होणार असून, संत्रा उत्पादकांना हक्काची बाजारपेठ मिळेल, असा विश्वास दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला.
मासोद येथे सिट्रस इस्टेट उभारण्याबाबत मागणी माजी जलसंपदा राज्यमंत्री कडू यांनी तत्कालीन कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली होती. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत प्रस्तावही शासनाला सादर करण्यात आला. या कामाचा कडू यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
मासोद येथील १०.१२ हेक्टर जमिनीवर सिट्रस इस्टेट निर्माण होणार असून, शासनाकडून त्याला मान्यता देण्यात आली आहे. संत्रा उत्पादक शेतकरी बांधवांना प्रकल्पाचा मोठा लाभ मिळेल, असा विश्वास कडू यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, की सिट्रस इस्टेटद्वारे संत्रा बागांच्या आधुनिकीकरणासह संत्रा फळपीक प्रक्रिया, संकलन, ग्रेडिंग, पॅकेजिंग, साठवण, विपणन, वाहतूक व निर्यातीला चालना मिळणार आहे.
संत्रापिकाची उच्च दर्जाची कलमे पुरेशा प्रमाणात निर्माण करण्यासाठी मासोद येथील तालुका फळरोपवाटिकेच्या प्रक्षेत्रावर उच्च तंत्रज्ञानाधारित फळरोपवाटिका तयार करण्यात येईल. संत्र्यांच्या जातिवंत मातृवृक्षांची लागवड प्रक्षेत्रावर केली जाईल.
संत्रा पिकाच्या शास्त्रोक्त लागवड पद्धतीच्या फळबागा विकसित करण्यासाठी शेतकऱ्यांना उच्च दर्जाची कलमे किफायतशीर दराने उपलब्ध करून देण्यात येतील.
शेतकऱ्यांना मिळणार विविध सुविधा
सिट्रस इस्टेटच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना विविध सुविधा मिळतील. अवजार बँक स्थापन करून शेतकऱ्यांना साधने, निविष्ठा उपलब्ध करून दिल्या जातील. युनिट स्थापून जैविक खत व इतर निविष्ठा शेतकऱ्यांना वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येतील.
स्थानिक गरजांनुसार शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, यांत्रिकीकरण सुविधा, काढणीत्तोर व्यवस्थापन सुविधा निर्माण करणे, इंडो-इस्रायली तंत्रज्ञानाचा प्रचार आदी कामे केली जातील.
प्रकल्पाची कामे वेगाने पूर्ण होण्यासाठी निधी मंजूर असून, काम पूर्णत्वास जाण्यासाठी सातत्याने पाठपुरावा होत आहे. सिट्रस इस्टेटच्या कामांचे संनियंत्रण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती करेल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.