अकोला ः यंदाच्या हंगामात कपाशीची लागवड (Kharif Cotton Cultivation) होऊन कुठे दोन तर कुठे दीड महिन्याचा कालावधी पूर्ण झाला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (Dr. Panjabrao Deshmukh Agriculture University) तज्ज्ञांनी जिल्ह्यातील बोरगावमंजू, बाभूळगाव शिवारात प्रक्षेत्र भेट दिली. त्या वेळी त्यांना कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव (Boll Worm Outbreak On Cotton) दिसून आला. विशेषतः ज्या शेतांच्या आसपास कापूस जिनिंग मिल आहेत आणि ज्या ठिकाणी कपाशीची पेरणी जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेली आहे, अशा शेतातील कपाशीवर सध्या फुले व पात्यांमध्ये गुलाबी बोंड अळी आढळून आली.
विद्यापीठ कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. डी. बी. उंदिरवाडे म्हणाले, ‘‘कापूस जिनिंग मिलच्या बाजूला असलेल्या शेतातील कामगंध सापळ्यांमध्ये सरासरी चार ते पाच प्रौढ गुलाबी बोंड अळीचे पतंग आढळून आले आहेत. कपाशीच्या शेतामधील जी फुले सुकलेल्या अवस्थेत होती, अशा प्रत्येक फुलात गुलाबी बोंड अळी आढळून आली. ती फुले काढून बघितली असता दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळी फुलामधून कोवळ्या बोंडामध्ये शिरताना आढळून आली. जिनिंग मिल बाजूला असल्यामुळे त्या कपाशीच्या शेतात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव ५० ते ६० टक्के आढळून आला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली, त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ज्यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली, त्यांनीही निरीक्षण करावे, असे आवाहन केले आहे.’’
...अशा करा उपाययोजना
- पीक ९० दिवसांचे होईपर्यंत दर आठवड्यात पिकामध्ये सर्वेक्षण करून डोकळ्या वेचून अळ्यासह नष्ट कराव्यात.
- एकरी दोन कामगंध सापळे लावावेत. त्यात अडकलेले पतंग किमान दर आठवड्याने नष्ट करावेत
- एकरी तीन ट्रायकोकार्ड या प्रमाणे पात्या अवस्थेपासून दहा ते बारा दिवसांचे अंतर आणि ४ ते ५ वेळा कपाशी पिकामध्ये लावावेत. प्रत्येक ट्रायकोकार्डच्या २० पट्ट्या कापाव्यात, अशा एकूण ६० पट्ट्या कपाशी पिकामध्ये समसमान अंतरावर पिकाच्या खालच्या बाजूला टाचाव्या.
- सापळ्यामध्ये पतंग अडकण्यास सुरुवात झाल्याबरोबर ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडीरेक्टीन (१५०० पीपीएम) २५ मिली प्रति १० लिटर या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.
- फुलांमध्ये प्रादुर्भाव ५ टक्क्यांपर्यंत आढळून आल्यास क्विनॉलफॉस(२० टक्के) २५ मिली किंवा क्लोरपायरीफॉस (२० टक्के) २५ मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.
- प्रादुर्भाव ५ ते १० टक्क्यांपर्यंत आढळून आल्यास थायोडीकार्ब (७५ टक्के) २० ग्रॅम किंवा इंडोक्झाकार्ब (१५.८ टक्के) १० मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव १० टक्क्यांपेक्षा जास्त आढळून आल्यास इमामेक्टीन बेंझोएट (५ टक्के दाणेदार) ४ ग्रॅम किंवा संयुक्त कीटकनाशकांपैकी प्रोफेनोफॉस (४० टक्के) अधिक सायपरमेथ्रीन (४ टक्के) २० मिली किंवा क्लोरपायरीफॉस ( ५० टक्के) अधिक सायपरमेथ्रीन (५ टक्के) २० मिली किंवा सायपरमेथ्रीन (१० टक्के) अधिक इंडोक्झाकार्ब (१० टक्के)) एससी १० मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. टीप- सर्व प्रमाण हाय व्हॉल्यूम पंपासाठीचे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.