उपलब्ध पाण्यावर आडसाली ऊस लागवडीला सुरुवात

पुणे विभागातील बागायती भागातील स्थिती; पावसाची प्रतीक्षा
Sugarcane
SugarcaneAgrowon

पुणे ः चालू वर्षी चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे (Rain Prediction) शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर ऊस लागवडींना (Sugarcane Cultivation) सुरुवात केली आहे. पुणे विभागातील बागायती भागातील शेतकऱ्यांनी लागवडी सुरू केल्या आहे. येत्या काळात चांगला पाऊस झाल्यास ऊस लागवडींना (Sugarcane Farming) वेग येण्याची शक्यता आहे.

जून महिना सुरू होऊन जवळपास वीस दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगाम वाया जातो की काय, अशी स्थिती असताना पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला प्राधान्य दिले आहे. विभागात ऑक्टोबरअखेरपर्यंत आडसाली उसाच्या लागवडी करता येणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी उसाच्या क्षेत्रात बऱ्यापैकी वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पुढील गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होण्याचा अंदाज वर्तविण्यात येण्यात येत आहे.

दरवर्षी होत असलेल्या पावसामुळे पुणे विभागातील मुळा, भंडारदरा, कुकडी, उजनी, जायकवाडी, खडकवासला, पानशेत यांसह अनेक धरणांत पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता आहे. मात्र इतर पिकांच्या तुलनेत ऊस पीक हे शाश्‍वत उत्पन्न म्हणून शेतकरी ऊस पिकांकडे पाहतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी दरवर्षी आडसाली उसाच्या लागवडी करतात. यंदा जूनच्या सुरुवातीला पावसाचा थोड्याफार प्रमाणात खंड पडला असला, तरी अनेक ठिकाणी कमी अधिक पाऊस पडला. त्यामुळे ऊस लागवडी खोळंबल्या असल्या तरी काही शेतकऱ्यांनी ऊस लागवडीवर भर दिला.

दरवर्षी शेतकरी आडसाली, पूर्वहंगामी, सुरू अशा तीन हंगामांत उसाच्या लागवडी करतात. जून ते जुलै महिन्यांत आडसाली उसाच्या शेतकरी प्रामुख्याने लागवडी करतात. लागवड केल्यानंतर साधारणपणे पंधरा ते सतरा महिन्यांनी ऊस साखर कारखान्यास तोडणीस देतात. पुणे विभागात उसाचे एकूण सरासरी ३ लाख ७० हजार ७८१ हेक्टर क्षेत्र आहे. विभागातील नगर जिल्ह्यात शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, नेवासा, कोपरगाव या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात लागवडी करतात.

पुणे जिल्ह्यातील दौंड, हवेली, शिरूर, बारामती, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव, पुरंदर या तालुक्यांतही लागवडी करतात. तर मुळशी, मावळ, वेल्हे, खेड ही तालुके उसाच्या लागवडीपासून दूर असतात. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, करमाळा, माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, अक्कलकोट या तालुक्यात उसाच्या लागवडी करतात. तर बार्शी, सांगोला, सोलापूर या तालुक्यात कमी लागवडी करतात.

जिल्हानिहाय आडसाली उसाचे क्षेत्र (हेक्टरमध्ये) ः

जिल्हा ---- सरासरी क्षेत्र

नगर --- १,०२,६१३

पुणे --- १,३०,६३१

सोलापूर --- १,३७,५३६

एकूण --- ३,७०,७८१

पावसाचा चांगला अंदाज असल्याने यंदा मी २२ ते २५ एकरांवर ऊस लागवड करणार आहे. त्यासाठी शेत तयार केले असून, ही सर्व लागवड ठिबकवर करणार आहे. त्यापैकी पाच ते सहा एकरांवर लागवड झाली आहे. येत्या काळात चांगला पाऊस झाल्यास ऊस उत्पादकांना चांगलाच आधार मिळणार आहे.
धनंजय आटोळे, प्रगतिशील शेतकरी, राजेगाव, ता. दौंड, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com