मुंबई : ‘‘पीक विम्यासाठी (Crop Insurance) पात्र असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या दाव्यासाठी (Insurance Claim) कमीत कमी एक हजार रुपये पीक विमा कंपनीला (Crop Insurance Company) द्यावेच लागतील,’’ असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पीक विमा कंपन्यांच्या बैठकीत दिले.
कृषिमंत्री सत्तार यांनी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीला पाचही विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत १५ डिसेंबरपर्यंत १९६६ कोटी ६३ लाख रुपयांचा विमा शेतकऱ्यांना दिल्याची माहितीही कंपन्यांनी दिली. तसेच ४४७ कोटी सहा लाख रुपयांची विमा रक्कम देणे अद्याप प्रलंबित आहे.
राज्यातील ९६ लाख ९१ हजार ४१२ शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. या शेतकऱ्यांना २४१३ कोटी ६९ लाख रुपयांची भरपाई निश्चित केली आहे. त्यापैकी १९६६ कोटी ६३ लाख रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली आहे. सत्तार यांनी विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर काही रुपयांची रक्कम जमा झाल्याबाबत विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना विचारणा केली.
यावर एका शेतकऱ्याने वेगवेगळ्या क्षेत्राचा विमा भरला. त्याचे वेगवेगळे दावे दाखल केले. त्यांची रक्कम वेगवेगळ्या क्रमाने जमा केली आहे. त्यातील काही दाव्यांची रक्कम कमी आहे. मात्र, बहुतांश दाव्यांची रक्कम ही हजाराच्या पटीत आहे, असे कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले. यावर ‘‘ज्या शेतकऱ्यांनी दावा दाखल केला आहे, त्या शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपयांच्या आत विमा रक्कम मिळता कामा नये,’’ असे निर्देश सत्तार यांनी दिले.
...अशी आहे भरपाई
नैसर्गिक आपत्ती ः
एकूण सूचना...५२ लाख ७९ हजार ८०९
निश्चित नुकसान भरपाई मिळणाऱ्या सूचना...३८ लाख, ८५ हजार, ३०७
रक्कम...१६१३. ६ कोटी
वाटप रक्कम...१४३५ कोटी २४ लाख
भरपाई लाभार्थी संख्या...१६ लाख ५७ हजार, ५४३
नुकसान भरपाई रक्कम...६४८.३९ कोटी
रक्कम वाटप शेतकरी...१४ लाख ७० हजार ५७४
रक्कम...५३१. ३९ कोटी
काढणीपश्चात नुकसान
एकूण प्राप्त सूचना...५७ लाख तीन हजार ७९१
नुकसान भरपाई मिळणारे शेतकरी...२४ लाख ८ हजार ३१७
निश्चित केलेली रक्कम...१५२ कोटी २४ लाख
एकूण निश्चित व वितरित भरपाई स्थिती
एकूण लाभार्थी...५७ लाख ९१ हजार १३७
निश्चित रक्कम...२४१३. ६९ कोटी
वाटप झालेले शेतकरी...४३ लाख ८७ हजार ७६३
वाटप रक्कम...१९६६.६३
प्रलंबित रक्कम...४४७.६ कोटी
‘सततच्या पावसाच्या मदतीसाठी समिती’
‘‘सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली असली तरी त्याचे निकष न ठरल्याने ही भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे याबाबत सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात येणार आहे. ही समिती भरपाईचे निकष ठरवेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही याबाबत विनंती केली आहे. लवकरच याबाबतची घोषणा होईल,’’ असेही सत्तार म्हणाले.
‘‘एक दिवस बळीराजा’मुळे समस्या कळल्या’
‘‘राज्यात ‘एक दिवस बळीराजासाठी’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत जाणून घेतलेल्या समस्यांचे एकत्रीकरण केले जात आहे. त्यावर उपाय शोधण्यासाठी चार सचिवस्तरीय अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात येईल,’’ असेही सत्तार म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.