Mumbai News : गोसीखुर्द प्रकल्पात जलपर्यटनासाठी मान्यता देण्याबरोबरच नागपूर येथील सोनेगाव तलावाचे सुशोभीकरण, कार्ला लोणावळा येथे चाणक्य सेंटर फॉर एक्सलन्स, मिठबाव येथील गजबादेवी मंदिर सुविधा प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली.
राज्यात पर्यटनवाढीसाठी मोठा वाव असून, प्रत्येक विभागातील पर्यटनस्थळांचा दर्जा वाढवितानाच पर्यटकांच्या सोयीसाठी त्या ठिकाणी चांगले रस्ते, दळणवळणाची साधने, निवासाची दर्जेदार व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी दिले.
या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
गोसीखुर्द जलाशय जिल्हा भंडारा येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या वेळी या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.
गोसीखुर्द जलाशयात ४५ किमी जलप्रवास पात्र आहे. या ठिकाणची नैसर्गिक विविधता, मोठ्या बेटांची आणि बंदरांची उपलब्धता असल्याने आंतरराष्ट्रीय जलपर्यटन करण्यात येणार आहे.
देशातील सर्वोत्तम असा हा जलपर्यटन प्रकल्प वेळेपूर्वी जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली. हा प्रकल्प भंडारा आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्यांच्या किनाऱ्यावर होत असून, या ठिकाणी सुरू असलेला अंभोरा मंदिर विकास प्रकल्प आणि जलपर्यटन प्रकल्प एकत्रित करण्याची सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी केली.
एमटीडीसीच्या माध्यमातून लोणावळा कार्ला येथे करण्यात एमआयसीई सेंटर आणि चाणक्य सेंटर फॉर एक्सलन्स संदर्भात सादरीकरण करण्यात आले. कार्ला येथील एमटीडीसी पर्यटक निवासाला एमआयसीई (मीटिंग, इन्सेटिव्ह, कॉन्फरन्स, एक्झिबिशन) सेंटर करण्यात येणार आहे. मुंबईच्या जवळ हा परिसर असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक येतात त्यांना या ठिकाणी दर्जेदार सुविधा मिळायला हवी, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.
कोयना बामणोली येथे स्कुबा डायव्हिंग तातडीने सुरू करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. नागपूर येथील सोनेगाव तलावाच्या सुशोभीकरणाबाबत सादरीकरण करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिठबाव येथील गजबा देवी मंदिर परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याबाबत आराखडा सादर करण्यात आला. भाविकांसाठी चांगल्या सुविधा देतानाच बगीचे, रस्ते करून पर्यटनवाढीसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.
बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ आदी उपस्थित होते. या वेळी नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी सादरीकरण केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.