GM Cotton : नवा ‘जीएम’ कापूस वाण चाचण्यांस संमती

भारतातील एकूण कापूस क्षेत्रापैकी सुमारे ८० टक्क्यांहून अधिक क्षेत्र बीटी कापसाखाली आहे. मात्र सध्या बाजारपेठेत उपलब्ध ‘बीजी वन’ आणि ‘बीजी टू’ असे दोन्ही बीटी कापूस वाण प्रकार गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण करण्यामध्ये निष्प्रभ ठरले आहेत.
GM Cotton
GM CottonAgrowon
Published on
Updated on

GM Cotton पुणे : कपाशी पिकातील सर्वांत गंभीर समस्या निर्माण केलेल्या गुलाबी बोंड अळीला (Cotton Boll Worm) प्रतिकारक संकरित कापसाचे नवे जीएम (जनुकीय सुधारित) वाण कापूस (GM Cotton) उत्पादकांच्या लवकरच हाती येईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

या अळीला प्रतिकारक वाणाच्या कृषी विद्यापीठ वा संशोधन संस्थेतील चाचण्यांसाठी (बीआरएल वन) जनुकीय अभियांत्रिकी मूल्यांकन समितीने (जीईएसी) हैदराबाद येथील कंपनीला हिरवा कंदील दाखविला आहे.

विशेष म्हणजे हरियाना सरकारने ना हरकत प्रमाणपत्र देत, या वाणाच्या चाचण्या आपल्या राज्यात होण्यासाठी अनुमती दर्शविल्याने यंदाच्या खरीप हंगामात तेथे चाचण्या सुरू करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

भारतातील एकूण कापूस क्षेत्रापैकी सुमारे ८० टक्क्यांहून अधिक क्षेत्र बीटी कापसाखाली आहे. मात्र सध्या बाजारपेठेत उपलब्ध ‘बीजी वन’ आणि ‘बीजी टू’ असे दोन्ही बीटी कापूस वाण प्रकार गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण करण्यामध्ये निष्प्रभ ठरले आहेत.

या दरम्यान हैदराबाद येथील एका कंपनीने या अळीला प्रतिकारक जीएम कापसाचे वाण विकसित केले आहे.

‘क्राय टू एआय’ या जनुकाचा प्रभाव दाखवणारा व ‘१८ एल- ५-३ या इव्हेंट’चा समावेश असलेला हा वाण आहे. या वाणाच्या देशातील कृषी विद्यापीठ किंवा संशोधन संस्थांमधील चाचण्यांसाठी (बीआरएल वन) कंपनीने जनुकीय अभियांत्रिकी मूल्यांकन समितीकडे (जीईएसी) संमतीसाठी अर्ज केला होता.

जैवतंत्रज्ञान विभागाची शिफारस

यंदाच्या खरीप हंगामात (२०२३) तेलंगणातील जानवाडा, महाराष्ट्रात जालना व अकोला, गुजरातमध्ये जुनागढ व हरियानात हिसार अशा देशातील पाच ठिकाणी या चाचण्या घेण्यासाठी संबंधित कंपनीने ‘जीईएसी’कडे संमती मागितली होती.

तत्पूर्वी मागील वर्षी जानेवारीत भारतीय जैवतंत्रज्ञान विभागाच्या ‘आरसीजीएम’कडून (रिव्ह्यू कमिटी ऑफ जेनेटिक मॅनिप्युलेशन) कंपनीच्या अर्जावर विचार होऊन त्याची शिफारस करण्यात आली.

त्यानंतर ऑगस्टमध्ये ‘जीईएसी’ची बैठक झाली. त्यामध्ये चाचण्या घेण्यासाठी संबंधित कंपनीने जी ठिकाणे निवडली आहेत, त्या राज्यांचे ना हरकत (नो ऑब्जेक्शन) प्रमाणपत्र घेण्यासंबंधी चर्चा झाली.

त्यानुसार ऑक्टोबरमध्ये या राज्यांना आपल्या प्रतिक्रिया ६० दिवसांच्या मुदतीत देण्यासंबंधी विनंतीपत्रे देण्यात आली. त्यानुसार हरियाना सरकारने ‘बीआरएल-१’ चाचण्या आपल्या राज्यात घेण्यासंबंधीचे प्रमाणपत्र नोव्हेंबर २०२२ मध्ये सादर करीत या चाचण्यांना अनुमती दर्शविली. अन्य राज्यांकडून मात्र या मुदतीत अद्याप प्रतिसाद लाभलेला नाही.

तथापि, हा प्रस्ताव विचाराधीन असून, उच्चस्तरीय संमती मिळाल्यानंतर निर्णय घेणार असल्याचे तेलंगण राज्यातर्फे सांगण्यात आले आहे. त्यासाठी पुरेसा कालावधीही मागून घेण्यात आला आहे.

‘जीईएसी’कडून हिरवा कंदील

दरम्यान, ‘आरसीजीएम’ने केलेल्या शिफारशी व हरियाना सरकारकडून मिळालेले संमतिपत्र हे दोन मुद्दे ‘जीईएसी’ने ग्राह्य धरले. त्याआधारे संबंधित कंपनीला गुलाबी बोंड अळी प्रतिकारक जीएम कापूस वाणाच्या ‘बीआरएल- १’ चाचण्या खरीप २०२३ मध्ये घेण्यासाठी काही अटींवर नुकतीच संमती देण्यात आली आहे.

GM Cotton
Cotton Market : केंद्रे तयार, खरेदीचा पत्ता नाही

या अटी पुढीलप्रमाणे...

- ‘आरसीजीएम’च्या अटी व शिफारशींचे पालन करणे बंधनकारक.

- मर्यादित चाचण्यांसाठी निश्‍चित मार्गदर्शक तत्त्वांनुसार कंपनीला चाचणी क्षेत्राची सविस्तर माहिती द्यावी लागणार.

- संबंधित राज्याने ठरवून दिलेल्या ‘बायोडायव्हरसिटी हॉटस्पॉट’ क्षेत्राच्या मर्यादेतच चाचण्या घ्याव्या लागणार. विलगीकरण अंतर, क्षेत्रमालकी, चाचण्यांशी संबंधित प्रमुख शास्त्रज्ञ आदींचा तपशील द्यावा लागणार.

- चाचण्यांचे निष्कर्ष राज्य जैवविविधता मंडळ व स्थानिक पंचायत जैवविविधता व्यवस्थापन समितीला सादर करणे बंधनकारक.

GM Cotton
Cotton Rate : पांढऱ्या सोन्याला किती मिळतोय दर तुम्हाला माहितेय का?

‘बीआरएल १’ चाचण्यांमध्ये होईल पुढील बाबींचा अभ्यास

- गुलाबी बोंड अळीमुळे बोंडांचे होणारे नुकसान

- संबंधित वाणात प्रत्यारोपित जनुकाचा परिणाम- प्रभाव (प्रोटीन एक्स्प्रेशन)

- पीक कालावधी, उंची, उत्पादन, बोंडांची संख्या, वजन, आकार

- जैवसुरक्षितता चाचण्यांमध्ये उंदीर, ससे यांच्यावरील परिणाम

- लक्ष्यित नसलेले (नॉन टारगेटेड) सजीव, माती व त्यामधील सूक्ष्मजीव.

काय आहेत ‘बीआरएल’ चाचण्या?

नागपूर येथील मध्यवर्ती कापूस संशोधन संस्थेचे (सीआयसीआर) संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद म्हणाले, की हरियाना भागात कापूस लागवड हंगाम एप्रिल १५ पासून सुरू होतो. त्यामुळे तेथे लवकर संमती मिळावी असावी. तेथील हिस्सार किंवा अन्य विद्यापीठात या चाचण्या सुरू होतील असे वाटते.

संबंधित राज्याकडून ना हरकत प्रमाणपत्र आल्यानंतरच विद्यापीठे वा संशोधन संस्था चाचण्या सुरू करू शकतात. आमच्याकडे संबंधित कंपनीकडून चाचण्यांच्या अनुषंगाने प्रस्ताव आलेला नाही.

GM Cotton
Cotton Market : बाजारातील कापूस आवक स्थिरावली; दरपातळी काहिशी सुधारली

कोणत्याही नव्या जीएम वाणाच्या चाचण्या सुरू करताना दोन पातळ्या बंधनकारक असतात. त्यातील जैवसुरक्षितता संशोधन पातळी १ (बायोसेफ्टी रिसर्च लेव्हल- बीआरएल- वन) वरील चाचण्या पॉलिहाउस किंवा संरक्षित क्षेत्रात घेतल्या जातात.

पातळी दोनच्या चाचण्या खुल्या प्रक्षेत्रात तज्ज्ञांच्या देखरेखीखाली घेतल्या जातात. यात जैविक क्षमता, (बायोइफिकसी), पर्यावरण, मित्रकीटकांसाठी संबंधित वाण सुरक्षित असणे यासंबंधीने संशोधन केले जाते.

‘सीआयसीआर’मध्येही संशोधन

डॉ. प्रसाद म्हणाले, की गुलाबी बोंड अळीला प्रतिकारक वाण कापूस उत्पादकांसाठी सादर होणे अत्यंत गरजेचे आहे. कापूस पिकातील ही प्रथम क्रमांकाची कीड झाली आहे. आमच्या संस्थेतही त्यावर संशोधन सुरू आहे.

त्यासाठी प्रभावी प्रथिन शोधले आहे. मात्र ‘बीआरएल’ पातळीला जाण्यापर्यंत संशोधन पोहोचायचे आहे. काही खासगी कंपन्यांही अशा वाणांच्या अनुषंगाने ‘जीईएसी’कडे अर्ज करण्याच्या प्रक्रियेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com